पिंपरी-चिंचवड : वैयक्तिक वादातून महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बालेवाडी येथे घडली. या प्रकरणी महिला पोलिस अधिकार्याने तक्रार केल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी चार जणांना अटक केली. बुधवारी (31 जानेवारी) पहाटे ही घटना घडली. शशिकांत श्रीमंत खरात (रा. लोढा सोसायटी, मुंबई), सूरज ननावरे, आदित्य रोकडे, राहुल जाधव अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपींना न्यायालयीन कोठडी
पोलिस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला अधिकारी आणि आरोपी हे एकमेकांना ओळखतात. रामकुमार शेडगे या मित्रासोबत त्यात जात होत्या. त्याचवेळी आरोपींनी शेडगेचे अपहरण केले. त्यानंतर महिला पोलिस अधिकार्याच्याही अपहरणाचा प्रयत्न केला. या प्रकरणी त्यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर शशिकांत खरातला शिवाजीनगर पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली. तत्पूर्वी, अपहरण करण्यात आलेल्या शेडगेला आरोपींनी भिवंडी पोलिस ठाण्यात हजर केले. तिथे शेडगेवर अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली, अशी माहितीही पोलिस निरीक्षक उंडे यांनी दिली.