महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तेजस्विनी पथक

0

पथकात आरपीएफच्या दहा महिला कर्मचार्‍यांचा समावेश

भुसावळ (प्रतिनिधी)- धावत्या रेल्वेत व स्थानकावरील महीला प्रवाशांना सुरक्षा मिळावी यासाठी रेल्वे विभागाने तेजस्विनी पथकाची स्थापना केली आहे. पथकाच्या माध्यमातून लहान बालके व मषसलांना सुरक्षीत प्रवासाची हमी दिली जात आहे. यासाठी 182 ही सुरक्षा हेल्पलाईन सुरू करण्यात आली असल्याची माहिती भुसावळ विभागाचे व्यवस्थापक आर.के.यादव यांनी शुक्रवारी सकाळी डीआरएम कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत दिली.

महिला सुरक्षेसाठी ‘तेजस्विनी पथक’
रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षीत करण्यासाठी भुसावळ विभागाने अनेक उपाय योजनांना प्राधान्य दिले आहे. यामध्ये महिला व बालकांचा सुरक्षीत प्रवास व्हावा या दृष्टीने रेल्वे विभागाने पावले उचलली असून भुसावळ विभागात आरपीएफच्या महिला कर्मचार्‍यांचे ‘तेजस्विनी पथक’ स्थापन करण्यात आले आहे. पथकाच्या माध्यमातून स्थानकावर व धावत्या रेल्वेत महिला प्रवाशी व बालकांच्या सुरक्षीत प्रवासाची हमी दिली जाणार आहे. यासाठी तेजस्विनी पथकाने 182 ही सुरक्षा हेल्पलाईन सुरू केली आहे. हेल्पलाईनवर तक्रार येताच तेजस्विनी पथकाच्या माध्यमातून तातडीने दखल घेवून तक्रारदारास दिलासा दिला जाणार आहे. इतकेच नव्हेतर तेजस्विनी पथक महिला प्रवाशी व स्थानकावरील महिला कर्मचारी यांच्या सतत संपर्कात राहून सुरक्षीततेची हमी देणार आहेत. पथकाच्या माध्यमातून मागील वर्षात 245 तर यंदा 135 तक्रारींचा निपटारा करण्यात आली असल्याची माहिती भुसावळ विभागाचे व्यवस्थापक आर.के.यादव यांनी पत्रकार परीषदेत दिली. पत्रकार परीषदेला वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, डीसीएम व्ही.पी.दहाट, आरपीएफ सहाय्यक आयुक्त राजेश दिक्षीत, आरपीएफ निरीक्षक एस.एस.हरणे, डीई इलेक्ट्रीक इंजिनिअर सारीका गर्ग, आरपीएफ निरीक्षक प्रवीण कसबे, उपनिरीक्षक जयश्री पाटील यांच्यासह तेजस्विनी पथकातील महिला कर्मचारी व विभागातील महीला कर्मचारी यांची उपस्थिती होती.

व्हॉटस अ‍ॅप ग्रुप
महिलांच्या सुरक्षीत प्रवासासाठी रेल्वेच्या आरपीएफ विभागाने ‘आरपीएफ सहेली’ या पद्धतीचा व्हॉटस अ‍ॅप गृप तयार केला आहे. या गृपच्या अ‍ॅडमीन विभागातील वरीष्ठ महिला उपनिरीक्षक जयश्री पाटील असून या व्हॉटस ग्रुपचा क्रमांक 7745019127 असा आहे. या व्हॉटस अ‍ॅप गु्रपवर तक्रार येताच तातडीने महिला प्रवाशांना तेजस्विनी पथकाकडून मदतीचा हात दिला जाणार असून काही सुचनांही दिल्या जाणार आहेत.

समितीत यांचा आहे समावेश
भुसावळ विभागातील महीला व लहान बालकांना सुरक्षा पुरवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आर.के.यादव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीत विभागीय सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे, सारीका गर्ग, डिसीएम व्ही.पी.दहाट यांचा समावेश आहे.

विशेष पथक करणार समस्यांचा निपटारा
तेजस्विनी पथक महिलांच्या संपर्कात राहून संबधीत गुन्ह्यांच्या विरोधात विभागात कार्य करून संबधीत गुन्ह्याचा निपटारा करणार आहे. पथक महिला आणि बालकांच्या प्रवासादरम्यान सुरक्षेची हमी देवून मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान राबवून आवश्यक उपाय योजनांचीही माहिती देणार आहे.