जुन्या चोर्यांचा उलगडा होण्याची शक्यता : आरोपींविरुद्ध गुन्हा
यावल : महिलेच्या पर्समधील रोकडवर डल्ला मारत असतानाच महिला प्रवासी सावध झाल्याने बर्हाणपूरमधील दोघा अट्टल चोरट्या महिलांच्या यावल पोलिसांना मुसक्या आवळण्यात बुधवारी यश आले. रीना सुकदेव मानकर (35) व क्रांती मानकर (25, दोन्ही रा. रेल्वे स्टेशन लालबाग बर्हाणपूर, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपी महिलांची नावे असून त्यांच्याविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अटकेतील आरोपींनी खोटी नावे सांगितल्याची माहिती तपासात पुढे आली असून या महिला नागपूरच्या राहणार्या असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
महिला प्रवाशाची सतर्कता आली कामी
बुधवार, 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास यावल बसस्थानकावर चोपडा-बर्हानपूर बस (एम.एच. 12,- 9828) मध्ये रावेर जाण्यासाठी प्रवासी महिला उषाबाई साहेबा खा तडवी (35, रा. आडगाव ता.यावल) या कुटुंबासह चढत असताना आरोपी महिला तडवी यांच्या पर्समधील दहा हजारांची रोकड चोरत असल्याचे लक्षात येताच तडवी यांनी आरडा-ओरड केल्यानंतर नागरीक धावून आल्यानंतर त्यांनी महिलांना पकडले.
आरोपी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
उषा तडवी यांच्या फिर्यादीवरून दोघा महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक अरुण धनवडे, सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, हेड कॉन्स्टेबल मुजफ्फर खान, महिला पोलिस खराटे सीमा चिखलकर यांनी आरोपी महिलांना अटक केली.