महिला बचत गटांना अधिक सशक्त बनविण्याचा शासनाचा प्रयत्न

0

मनोर । महिला बचत गटांना अधिक प्रभावशाली व सशक्त बनविण्यासाठी त्यांना भेडसावणार्‍या समस्या दूर करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. बचत गटांना सक्षम बनविण्यासाठी बचत गट उत्पादनांना विक्री व्यस्था आदिवासी विकास विभागातर्फे करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी पालघर कोंकण सरस विक्री व प्रदर्शनच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केले. कोंकण विभागातील महिला बचत गट यांनी उत्पादित केलेल्या मालाची, वस्तूंची थेट ग्राहकांना विक्री करून महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या उद्धेशाने जिल्हा परिषद पालघर व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने 23 ते 27 डिसेंबर या कालावधीत पालघर येथे कोंकण सरस विक्री व प्रदर्शन 2017 चे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंदुदुर्ग, ठाणे आणि नाशिक या सहा जिल्ह्यातील महिला बचत गट सहभागी झाले आहेत. महिला बचत गट, उत्पादक व ग्राहक यांच्यामधील साखळी कमी करून उत्पादकांचा माल थेट ग्राहकांच्या दारात ही संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने या मोहोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यात 122 स्टोल उभारण्यात आले असून या महोत्सवात रत्नागिरीचे सहा, रायगडचे 10, सिंदुदुर्गचे 12, पालघरचे 65, ठाण्याचे 25 आणि नाशिकचे चार महिला बचत गट सभागी झाले आहेत. या महोत्सवात लाकडी खेळणी, वारली हस्तकला, हस्तकला वस्तू, बांधणी प्रिंटचे वस्त्रे तसेच विवध मसाले, काजू गर, कोकम, कडक नाद कोंबडी, सेंद्रीय भाजीपाला इत्यादी वस्तू विक्री व प्रदर्शनासाठी उपलब्ध आहेत. तसेच या जिल्ह्यातील स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल यामध्ये समविष्ट असून या खाद्यपदार्थाना विशेष मागणी आहे.

शिक्षण विभागातर्फे चर्चासत्र
या महोत्सवात कृषी विभाग, पशु संवर्धन, स्वच्छ भारत मिशन, महिला बाल कल्याण विभाग, आरोग्य विभाग, ग्रामीण जीवन्नोती अभियान व शिक्षण विभागांतर्फे विविध चर्चासत्र, माहितीपर आणि जनजागृती कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आहे. या महोत्सवात दररोज किमान दोन- अडीच हजार नागरिक उपस्थित राहतील अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, उपाध्यक्ष निलेश गंधे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी व्यक्त केली.