चोपडा (प्रतिनिधी)
येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात ९ ऑगस्ट क्रांती दिवस व जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी, पर्यवेक्षक सुनील पाटील, ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत चौधरी व कार्यक्रमाच्या वक्त्या प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका निशा पाटील तसेच आदिवासी बांधव व पालकांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण करण्यात आले.
याप्रसंगी निशा पाटील यांनी युवा क्रांतिकारक खुदीराम बोस यांच्या जीवनातील देशभक्तीचे अनेक प्रसंग सांगून त्यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर प्रभावीरित्या मांडला. विद्यालयातील विविध विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ऐतिहासिक महापुरुषांच्या व क्रांतिकारकांच्या वेशभूषा केल्या होत्या. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता पाटील यांनी तर आभार प्रदर्शन व्ही. पी. महाले यांनी केले. कलाशिक्षक व्ही. डी. पाटील यांनी आकर्षक फलक लेखन केले होते. तत्पूर्वी सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मातीचे दिवे पेटवून पंचप्रण प्रतिज्ञा घेतली.