महिला काँग्रेस कमिटीच्या बैठकीत प्रतिपादन
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये शहर महिला काँग्रेस व युवती काँग्रेसची लवकरच संघटना बांधणी करण्यात येणार आहे. या महिला, युवती काँग्रेसचे सर्वसमावेशक विचार जनसामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी पुढाकार घेतील, अशी माहिती महिला काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी दिली. येथील काँग्रेसच्या कार्यालयात महिला काँग्रेस कमिटीची बैठक शुक्रवारी (दि. 6) झाली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, प्रदेश कार्यकारीणीचे सदस्य संग्राम तावडे, महिला प्रदेश सचिव बिंदू तिवारी, शहर महिला उपाध्यक्षा संगिता कळसकर, भोसरी ब्लॉक अध्यक्षा उषा खवळे, चिटणीस हुरबानो शेख, विनीता तिवारी, नंदा तुळसे, तृप्ती शिंदे आदी उपस्थित होते.
गिरीजा कुदळे पुढे म्हणाल्या की, स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशातील महिलांना शिक्षण, संपत्तीचे हक्क दिले. त्यामुळे आधुनिक भारताच्या प्रगतीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. आज दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, संगणक, दळवळणाच्या पायाभूत सुविधा, एफडीए या क्षेत्रात महिलांना कोट्यवधी रोजगार उपलब्ध झाले आहेत. हे काँग्रेसच्या सर्वसमावेशक विचारसरणीमुळे झाले आहे. हे आजच्या तरुण पिढीला सांगण्याचे काम महिला व युवती काँग्रेस नक्कीच करेल.