चेतन साखरे,जळगाव: शिर्षक वाचुन नक्कीच गोंधळात पडला असाल. पण जळगावची महिला राष्ट्रवादी आघाडी ही मुळात एक गाव बारा भानगडी यासारखीच आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीला कुठल्याही पक्षाकडे एवढ्या महिला पदाधिकारी नाही जेवढ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. मात्र जेवढ्या महिला अधिक तेवढ्याच कुरबुरीही अधिकच. अगदी प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांच्यापासून जळगाव राष्ट्रवादी महिला आघाडीचे नाव थेट मुंबईपर्यंत चर्चेत राहीले आहे. मुंबईहुन पदे घेऊन जिल्ह्यात राजकारण करण्याची महिला आघाडीची पध्दती ही जुनीच म्हणावी लागेल. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राजकारणात महिलांना 50 टक्के आरक्षण लागू केले. त्यामुळे राजकारणाकडे महिलांचा ओढा अधिक वाढला आहे. मात्र राजकारणात काम करणार्या महिला पदाधिकार्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन अद्यापतरी चांगला नाही हे ठासून सांगावे लागेल. असो जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी महिला आघाडीची कमान सध्या कल्पना पाटील यांच्याकडे आहे. त्यांचे चिरंजीव अभिषेक पाटील हे महानगराचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे एकाच घरात दोन पदे अशी ओरडही राष्ट्रवादीतून होत आहे. महिला राष्ट्रवादी आघाडीत नियुक्त्यांचा वाद नेहमीच चर्चेत राहीला आहे. या नियुक्त्यांवरूनच एकमेकांविरोधात तक्रारी करण्याची परंपरा जपली जातेय.
महिला प्रदेशाध्यक्षांकडून खतपाणी
महिला राष्ट्रवादीत बेबनाव होण्याला काही अंशी महिला प्रदेशाध्यक्षाही जबाबदारच राहील्या आहेत. तत्कालीन अध्यक्षा विद्या चव्हाण, चित्रा वाघ आणि आताच्या रूपाली चाकणकर या तिनही महिला प्रदेशाध्यक्षांनी महिलांमधील गटबाजीला वाव देण्याला मदतच केली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात महिला राष्ट्रवादीचे संघटन उभेच राहीले नाही. सातत्याने होणार्या वादांमुळे ग्रामीण भागातील अनेक महिला पक्षात येण्याला देखिल तयार नाहीत. प्रा. डॉ. अस्मिता पाटील, विजया पाटील, मंगला पाटील, शहराच्या माजी अध्यक्षा मिनल पाटील, प्रतिभा शिरसाठ, निला चौधरी, यांना गटबाजीचा फटका बसल्यानेच पदावरून दूर व्हावे लागले. सध्या महिला शहराध्यक्ष पद रिक्त आहे. तर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील या अजून तरी कमान सांभाळून आहेत.
आक्रमक आंदोलने पण संघटन नाहीच
महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या सत्ताकाळात अनेक आक्रमक आंदोलने झाली. त्यामुळे महिला राष्ट्रवादी निश्चीतपणे कौतुकाचा विषय ठरली होती. विरोधात आंदोलन आणि सत्ताकाळात संघटन बांधणी होणे गरजेचे आहे. महिला राष्ट्रवादीकडुन विरोधात असतांना आंदोलने झाली असली तरी सत्ताकाळात संघटन मात्र तेवढ्या वेगाने झाले नाही. महिला अध्यक्षा कल्पना पाटील यांनी जिल्ह्यात काही ठिकाणी दौरे देखिल केले पण या दौर्यांची फलश्रुती अद्याप तरी दिसून आली नाही. निवडणूक काळात महिलांना तिकीट मिळवून देण्यातही आघाडी कमीच पडली आहे. त्याला पुरूषी महत्वाकांक्षा देखिल तितकीच कारणीभूत राहीली आहे. जिल्ह्यात महिला आघाडीचे संघटन मजबूत करण्यासाठी नेत्यांची वाट पहावी लागते. नेते आले की, पदाधिकार्यांचा आणि कार्यकर्त्यांचा गोतावळा दिसून येतो आणि नेते गेले की, हेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते अचानक गायब होतांना पाहीले आहे.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने गाजली महिला आघाडी
गेल्या महिन्यात महिला राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडीयावर चांगलीच चर्चेत राहीले. राजकारण कशी पातळी सोडते याचा नमुनाच महिनाभरात बघायला मिळाला. चारीत्र्यावरून महिलांवर झालेले आरोप निश्चीतच निंदनीय आहेत. असे आरोप करणार्यांनी आधी पुरावे द्यावे आणि मग बोलावे. महिला राष्ट्रवादीतील काही पदाधिकार्यांवर झालेल्या आरोपांना आघाडीनेही तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र वैयक्तीक वादात पक्षाची बदनामी होतेय हे कुणाच्याही लक्षात आलेच नाही. आपल्या वादात पक्षाची फरफट होऊ नये ही प्रत्येक पदाधिकार्याची जबाबदारी असते. मात्र या जबाबदारीचे भानच कुणाला राहीले नाही. माध्यमांचा गोतावळा जमवून भडास काढण्याचा प्रकार महिनाभरात दिसून आला. यातुन कुणीच काही साध्य केले नाही. पक्षाची बदनामी झाली तेवढे मात्र खरे. संघटना वाढीपेक्षा इतर वैयक्तीक मुद्यांना अधिकच स्थान दिले जात असल्याने महिला राष्ट्रवादीची अवस्था म्हणजे एक गाव बारा भानगडी आहे.
संघटना वाढीसाठी मतभेद टाळावे
जिल्ह्यात महिलांचे संघटन वाढण्यासाठी आपसातील मतभेद आधी टाळले गेले पाहीजे. एकमेकांच्या तक्रारी करणे बंद झाले पाहीजे. उठसुठ मुंबई गाठायचे आणि तक्रारी करायच्या ही पध्दत बंद होणे आवश्यक आहे. प्रत्येकाला त्याच्या कर्तृत्वाप्रमाणे संधी देण्यासाठी वरीष्ठ नेत्यांनीही लक्ष घातले पाहीजे. राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे. या सत्तेचा फायदा महिलांचे संघटन वाढविण्यासाठी केला जावा हीच अपेक्षा.
क्रमश: