मुंबई । मुंबईत रिक्षा व टॅक्सीचालक असणार्या पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत महिलांनीदेखील या क्षेत्रात आगेकूच केली आहे. आता मुंबईच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात महिलाही रिक्षा चालवताना दिसणार असून यासाठी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. महिलांनाही रिक्षा चालवता यावी म्हणून राज्य परिवहन विभागाने गेल्या वर्षी महिलांनाही रिक्षाचे परवाने देण्याची घोषणा केली होती. त्यांच्यासाठी खास गुलाबी रंगाच्या रिक्षा तयार करण्यात आल्या आहेत. ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांनी ’बेटी बचाव, बेटी पढाव, बेटी बढाव’ अभियान राबवले आहे. या अभियानात त्यांनी 100 महिला रिक्षाचालकांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित केले आहे.
महिलांनी रचला नवा अध्याय
1 बँक अधिकारी, आरटीओ तसेच स्किल डेव्हलपमेंट अधिकार्यांना सोबत घेऊन या महिला रिक्षाचालकांना मार्गदर्शन केले. दरशनिवारी महिलांना रिक्षा खरेदीपासून तर लायसन्स, कर्ज याचे मार्गदर्शन केले जाणार आहे.
2 एका वर्षात मुंबईत एक हजार रिक्षाचालक महिलांना प्रशिक्षित करणार असल्याचे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. अनिता खाडे या दोन महिन्यांपासून मुलुंड परिसरात रिक्षा चालवतात. यामुळे घर खर्चात आर्थिक हातभार लावण्यास मदत मिळते असे सांगत.
3 माधुरी जाधव ह्या दोन वर्षे झालीत रिक्षा चालवतात. ज्या महिलांना रिक्षाचा व्यवसाय करायचा असेल त्यांना प्रशिक्षण देण्याची आपली तयारी आहे, असे त्यांनी सांगितले. जास्तीत जास्त महिलांनी हा व्यवसाय करावा असे त्यांना वाटते.
4 विक्रोळीच्या छाया मोहिते यांना पॅडमन या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. घर सांभाळून रिक्षा चालवण्याचे काम छाया मोहिते करतात. काही पुरुष रिक्षा चालक महिला रिक्षाचालकांसोबत वाद घालत दादागिरी करतात, या महिलांनी प्रत्युत्तर देत नवा अध्याय रचला.