ठाणे । मुंबई-ठाण्यात येणार्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे दिवसेंदिवस शहरांचा वेग वाढत आहे. तेव्हा, सगळे काही गतिमान झाले असल्याने एखाद्याचे गहाळ झालेले सामान अवघ्या काही क्षणातच हातोहात गायब होते. मात्र, याला अपवाद ठरल्या आहेत दीप्ती गावडे. ठाण्यातील कळवा येथील दीप्ती गावडे यांची लाखमोलाची बॅग तब्बल चार दिवसानंतर सुखरूप परत मिळाली आहे. या बॅगेत तब्बल साडेसहा लाखांचा ऐवज व मुद्देमाल होता. महिला रेल्वे कर्मचारी रेखा शिंदे यांच्या प्रामाणिकपणामुळे गावडे यांचा ऐवज परत मिळाल्याने गावडे याचा आनंद गगनात मावेना, त्यांनी महिला रेल्वे कर्मचारी शिंदे यांचे आभार मानले. राम नवमीच्या सुट्टी निमित्ताने दीप्ती गावडे गावी जाणार होत्या. घरातील सोने बँकेच्या तिजोरीत ठेवण्यासाठी 23 तारखेला ठाणे येथून गावडे ठाण्याहून जलद ट्रेनने मुंबईकडे निघाल्या. त्यांनी आपल्या बॅगेत 20 तोळे सोने आणि लॅपटॉप असा ऐकून साडेसहा लाखांचा ऐवज ठेवला होता. त्यांनी ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनलला जाणारी जलद लोकल पकडली. मात्र, ट्रेनमध्ये सीटवरून महिलांमध्ये झालेल्या भांडणाला कंटाळून गावडे या भायखळा येथे उतरल्या. काही वेळानंतर ट्रेनमध्ये आपली बॅग राहिल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर गावडे यांनी त्वरित रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली.
चार दिवसांनंतर त्यांना रेल्वे पोलिसांकाढून फोन आला. दीप्ती गावडे यांची बॅग मुद्देमालासह मिळाली असे समोरून सांगण्यात आले आणि दीप्ती यांचा कोणावरच विश्वास बसेना. दीप्ती यांची बॅग रेल्वेमध्ये काम करणारी महिला रेल्वे कर्मचारी रेखा शिंदे यांना सापडली. रेखा शिंदे यांनी आपली प्रामाणिकता दाखवीत साडेसहा लाखांचा मुद्देमालासह बॅग परत केली. हलगर्जीपणामुळे गावडे यांना मनस्ताप सहन करावा लागला. तर 22 वर्षापासुन रेल्वेमध्ये काम करणार्या रेखा शिंदे यांनी आपला प्रामाणिकता दाखवला. दरम्यान रेल्वे प्रशासनानाने रेखा शिंदे यांच्या कामाची दखल घेतली असून त्यांना पुरस्कार देण्यासाठी दिल्ली येथे आमंत्रित केले आहे.