महिला वाहतूक पोलिसाचा विनयभंग

0

हिंजवडी : वाकड येथील भूमकर चौकात वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावणार्‍या महिला वाहतूक पोलिसाचा युवकाने विनयभंग केला. ही घटना गुरुवारी सकाळी नऊला घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात विनयभंग करणार्‍या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. परीक्षित प्रभाकरराव देशमुख (वय 37, रा. एम्प्रेस पार्क, बालेवाडी), असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला वाहतूक पोलीस कर्मचारी गुरुवारी भूमकर चौकात वाहतूक नियमनाचे काम करत होती. त्यावेळी परीक्षित देशमुख हा त्याच्या दुचाकीवरून पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावरून विरुद्ध दिशेने जात होता. म्हणून त्या महिला वाहतूक पोलिसाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, देशमुख याने दुचाकी भरधाव पुढे नेत तिची अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच महिला पोलिसाच्या दिशेने हातवारे करत अपशब्द वापरले.

हिंजवडी पोलिसात गुन्हा
याप्रकरणी त्या महिला वाहतूक पोलीस कर्मचार्‍याने देशमुख याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यानुसार, त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत. तसे व्हिडिओही सोशल माध्यमांवर प्रसारित झाले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.