महिला वैद्यकीय अधिकार्‍याचा विनयभंग : 35 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा

0

यावल- तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकार्‍यांच्या शासकीय निवासस्थानात बेकायदेशीररीत्या प्रवेश करून उपसरपंचांनी डॉक्टरांचा विनयभंग केला व त्यानंतर जमाव जमवून दवाखान्यात डॉक्टरांनाच महिलांकडून मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री पावणेनऊ वाजता घडली. या प्रकरणी किनगाव उपसरपंचासह 35 जणांविरुद्ध विनयभंग, दंगल आदी कलमान्वये यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

खोट्या गुन्ह्यात अडकावण्याची धमकी
महिला वैद्यकीय अधिकार्‍यांच्या तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री सव्वासात वाजता शासकीय निवासस्थानात फ्रेश होण्यासाठी आल्यानंतर रात्री साडेआठ वाजता उपसरपंच तथा संशयीत आरोपी शरद अडकमोल (45) यांनी बेकायदा घरात प्रवेश केला व त्यांना बाहेर जाण्यासाठी सांगूनही त्यांनी हे सरकारी क्वार्टर असल्याने अरेरावी केली, डिलीव्हरी पेशंटसाठी रुग्णवाहिका देण्याची त्यांनी मागणी केली असता आपण चालकाला फोन करते, असे सांगितल्यानंतरही त्यांना राग आला व थांब तुला दाखवतो म्हणून ते निघाले. यानंतर डॉक्टर रुग्णालयात आल्या असता आरोपी हा गावातील 30 ते 40 नागरीकांना घेवून रुग्णालयात आले व त्यांनी रीक्षात आलेल्या डिलीव्हर पेशंटला वाहनातच तपासण्याचा आग्रह धरत शिवीगाळ केली तसेच खोट्या अ‍ॅट्रासिटीच्या गुन्ह्यात अडकावण्याची धमकीही दिली व यावेळी आरोपीसोबत असलेल्या चार ते पाच महिलांनी चपलांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला तसेच अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही देत सरकारी कामात अडथळा आणला. या प्रकरणी किनगांव खुर्द ग्रामपंचायतीचे उपसरपंच शरद अडकमोल, दामू सीताराम साळुंके व त्यांची पत्नी व 2 मुली व इतर 30 ते 35 ग्रामस्थांविरुद्ध दंगल, विनयभंग आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.