मुक्ताईनगर पोलिस निरीक्षकांसह तहसीलदारांना शिवसेनेचे निवेदन
मुक्ताईनगर- शहरातील प्रभाग 12 मधील विवाहितेला नोकरीचे आमिष दाखवत परराज्यात विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने या प्रकरणाच्या खोलात जावून उच्चस्तरीय समितीद्वारा चौकशी करावी तसेच महिला व मुलींच्या खरेदी विक्रीचे मोठ्या प्रमाणावर असलेल्या या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यावा तसेच पीडीत मुलीला योग्य न्याय देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार शाम वाडकर व पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांना संयुक्तीकरित्या देण्यात आले.
नोकरीच्या आमिषाने विवाहितेचे अपहरण
शिवसेना महिला आघाडीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा की, काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगरातील विवाहित महिलेला याच प्रभागातील रहिवासी असलेल्या विजय सावळे व रेखा सावळे या दाम्पत्याने 20 हजार रुपये महिन्याची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पळवून नेऊन गुजरात राज्यातील उधना येथे त्या महिलेस विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. सावळे दाम्पत्यावर मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला तसा गुन्हा सुद्धा दाखल आहे आरोपींनी इतरही महिलांना त्यांच्या जाळ्यात ओढून अश्याच प्रकारे विक्री केल्याची शक्यता आहे परंतु या दाम्पत्यावर विशिष्ट पक्षाच्या नेत्याचा वरदहस्त असून या गुन्ह्याचा तपास हा निःपक्षपाती पणे तसाच जलदगतीने करावा, अशी मागणी करण्यात आली. आरोपीस पाठीशी घालण्याचा प्रकार झाल्यास शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक कल्पना पालवे , उपजिल्हा संघटक सुषमा शिरसाठ, तालुका संघटक शोभा कोळी , शहर संघटक सरीता कोळी, उप शहर संघटक विद्या भालशंकर , उपतालुका संघटक उज्वला सोनवणे, उपतालुका संघटक सुनीता तळेले, उपशहर संघटक शारदा भोई आदींसह असंख्य महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.