महिला शौचालयास काटेरी झुडपांचा वेढा

0

बोदवड। सरकार एका बाजुने गाव हगणदारी मुक्तीसाठी करोडो रुपये खर्च करीत आहे. मात्र शिरसाळा ग्रामपंचायतीने दलित वस्तीजवळच्या महिलांच्या शौचालयाकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. या शौचालयाच्या भोवती काटेरी झुडपे, काटेरी गवत वाढलेले आहे. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. काटेरी झुडपांनी या शौचालयास पुर्ण वेढा टाकला असून या शौचालयापर्यंत जाण्यासाठी महिलांना जागा नाही तसेच शौचालयामध्ये ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा सुध्दा केलेला नाही.

हागणदारीमुक्ती फक्त कागदोपत्री
शौचालयावर पाण्याच्या टाक्या आहे. मात्र यात पाणीच नसल्यामुळे शौचालयाची नियमित स्वच्छताही केली जात नाही. गावातील महिलांना याबाबत विचारले असता सदरचे शौचालय तीन ते चार वर्षांपासून बंद आहे. ग्रामपंचायत फक्त कागदोपत्री हगणदारीमुक्ती करीत आहे. शिरसाळा ते रुईखेडा रस्ता व शिरसाळा-हिंगणा रस्त्यावर महिलांना उघड्यावर शौचास जावे लागते. यामुळे गावात रोगराई पसरण्याचा धोका आहे. गावात मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. एका मुलीचा डेंग्युमुळे मृत्यूसुध्दा झाला होता. तरी सुध्दा ग्रामपंचायत स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत आहे.