महिला सक्षमीकरणाच्या नुसत्याच बाता!

0

आंध्र प्रदेशातील जागतिक उद्योजक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महिलांच्या सक्षमीकरणावर भाषणे ठोकण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहिल्याबाई होळकर, लक्ष्मीबाई यांची उदाहाणे दिली. मात्र, राणी पद्मावतीला सोयीस्करपणे डावलले. एका बाजूला ही परिषद होत असताना त्याच वेळी महाराष्ट्रातील लातूर येथे मात्र एक बलात्कारपीडित तरुणी उपेक्षेचे घाव सोसत होती. एका सैनिकाने येथील एका महाविद्यालयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता आणि तिची तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलीस तिच्याकडे 50 हजारांची लाच मागत होते.

नुकतेच आंध्र प्रदेशात ‘जागतिक उद्योजक परिषद’ (ग्लोबल एन्टरप्रेनरर्स समिट) पार पडली. त्यामध्ये महिला सक्षमीकरणावर मोठमोठी भाषणे ठोकली गेली. त्याच वेळी महाराष्ट्रातील लातूर येथे मात्र एक बलात्कारपीडित तरुणी उपेक्षेचे घाव सोसत होती. ज्यांनी ज्यांनी एकाच दिवशी घडलेल्या या दोन विरोधाभासी घटना ऐकल्या किंवा वाचल्या असतील, त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली असेल की, महिला सक्षमीकरणाविषयीच्या भाषणातील चकचकीत शब्द वास्तवापासून मात्र फार दूर असतात. अलीकडच्या काळातील काही घटनांवरून ‘जनतेला सर्वाधिक धोका पोलिसांपासूनच आहे’, असे विचित्र चित्र निर्माण झाले आहे. ‘यात आता सैन्याचीही भर पडत चालली आहे की काय’, असे वाटण्याजोगी स्थिती निर्माण झाली आहे. सैन्यदलातील एका सैनिकाने लातूर येथील एका महाविद्यालयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी ती पोलिसांकडे तक्रार करण्यास गेली असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यासाठी तिच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली. हा प्रकार म्हणजे असंवेदनशील पोलिसांकडून करण्यात आलेला एक प्रकारचा मानसिक बलात्कारच म्हणावा लागेल. असे जनताद्रोही, असंवेदनशील, बेजबाबदार आणि पाषाणहृदयी पोलीस स्वत:हून जनतेचा रोष ओढवून घेत जनक्षोभाला आमंत्रण देत आहेत, हे सरकारने वेळीच जाणले पाहिजे तसेच त्यांना सेवेतून बडतर्फ केले पाहिजे. येथेच त्या पीडितेची अवहेलना थांबली असे नाही, तर ती ज्या महाविद्यालयात शिकते त्या महाविद्यालयाने ‘तुझ्यामुळे महाविद्यालयाची बदनामी होईल’, असे सांगत तिला महाविद्यालयातून काढून टाकले. या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला एका महिलेच्या अब्रूपेक्षा स्वत:ची प्रतिष्ठा महत्त्वाची वाटते का? या एकूणच प्रकरणात विविध समाजघटकांची जी पराकोटीची असंवेदनशीलता समोर आली, ती पीडितेचे खच्चीकरण करणारी, तर बलात्कार्‍यांचे मनोधैर्य उंचावणारी होती, असे खेदाने म्हणावे लागेल.

शेवटी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र सरकार आणि संरक्षण मंत्रालय यांना नोटीस पाठवून खुलासा मागवला आहे. हा भयानक प्रकार पाहता आंध्र प्रदेशातील परिषदेत महिला सक्षमीकरणाविषयी मारल्या जाणार्‍या गप्पा किती आभासी होत्या, हे स्पष्ट व्हावे. लातूर येथील घटना हे एक केवळ उदाहरण आहे, अशा अनेक घटना कुठे ना कुठे घडत असतील. त्याचे काय? ‘महिला प्रथम सुरक्षित असेल, तरच ती सक्षम होऊ शकते’, हा मुद्दा राजकारणी सोयीस्कररीत्या विसरतात. महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारणारे महिला सुरक्षिततेची जबाबदारी मात्र पार पाडताना दिसत नाहीत. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाविषयी बोलताना झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांची उदाहरणे दिली. परंतु, ‘पद्मावती’ चित्रपटातून ‘राणी पद्मिनी’ यांचा इतिहासच बदलला जात असताना ते त्याविषयी एक शब्दही बोलत नाहीत. चित्रपटाला ‘सेक्सी दुर्गा’ नाव देणे असो किंवा भोपाळ येथील एक बलात्कारपीडिता न्यायासाठी वणवण फिरल्याचे नुकतेच घडलेले प्रकरण असो, त्याविषयी सर्वच राजकीय पक्षांचे नेते मिठाची गुळणी धरून बसतात. हे चित्र देशासाठी नक्कीच भूषणावह नाही.

‘जागतिक उद्योजक परिषदे’त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इव्हांका यांनीही महिला सक्षमीकरणाचा मुद्दा उचलून धरला. तथापि, त्यांच्याच देशातील महिलांवर सध्या ‘मी टू’ ही मोहीम राबवण्याची वेळ आली आहे, हे त्या सोयीस्कररीत्या विसरल्या. ‘मी टू’ ही लैंगिक शोषण झालेल्या पीडित महिलांची न्याय मागण्यासाठीची मोहीम असून ती जगभर, अगदी भारतातही झपाट्याने पसरत आहे. यावरून या समस्येची तीव्रता लक्षात यावी. यास महिलांविषयीची पाश्‍चात्त्य कुप्रथाच कारणीभूत आहे. दुर्दैवाने आज आपल्याकडे पुढारलेपणाच्या नावाखाली सामाजिक आणि राजकीय पातळीवर पाश्‍चात्त्य अंधानुकरणाचे निलाजरे समर्थन केले जात आहे.
भोपाळ, लातूरसारख्या घटना, ही त्याचीच विषारी फळे आहेत. पंतप्रधानांनी राणी लक्ष्मीबाई आणि अहिल्याबाई होळकर यांची उदाहरणे दिली खरी; पण त्या एवढ्या सक्षम कशाच्या बळावर झाल्या, ते मात्र स्पष्ट केले नाही. अहिल्याबाईंचेच उदाहरण द्यायचे झाले, तर त्यांनी स्वतः इतकी नीतीमत्ता जपली जितकी एखादा पुरुषही कदाचितच एवढे करू शकेल. आपल्याकडे खरा इतिहासच शिकवला जात नसल्याने किंबहुना तो दडपून ठेवला जात असल्याने अहिल्याबाईंचे महान कार्य जनतेपर्यंत पोहोचू शकले नाही.

थोडक्यात अहिल्याबाई होळकर असो, राणी पद्मिनीदेवी असो किंवा अन्य शूर स्त्रिया असो, या सर्व थोर स्त्रियांनी आदर्श नीतीमूल्यांच्या आधारे आचरण केले, हे त्यांच्या सक्षमीकरणाचे गुपित होते. सद्यःस्थितीत महिलांवरील अन्याय रोखण्यासाठी जशी राजकीय पातळीवर कठोर आणि ठोस कृती होणे अपेक्षित आहे तसेच महिलांनीही नीतीमूल्यांची जपणूक करून स्वतःला स्वतःमध्ये सक्षम बनवले पाहिजे. या दोन्ही पातळ्यांवर जर उपाययोजना काढली, तर महिलांकडे कुणी वाकड्या दृष्टीने पाहण्याचेही धाडस करणार नाही आणि उद्योग क्षेत्रच काय, तर अनेकानेक शिखरे त्या सहज पादांक्रांत करू शकतील. आवश्यक आहे, त्या दिशेने पाऊल टाकण्याची!