माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची भुसावळात पत्रकार परीषद ; महिला बचत गटाला बाजारपेठ मिळणे उद्देश -रक्षा खडसे
भुसावळ- समाजातील महिलांना रोजगार मिळावा त्यासासेबत महिला सक्षमीकरणाला बळकटी मिळून त्यांना आर्थिक योगदान मिळण्याच्या हेतूने भुसावळात बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे हे पाचवे वर्ष असल्याची माहिती माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे दिली. शहरातील आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर गुरूवारी दुपारी त्यांनी पत्रकार परीषद घेतली. याप्रसंगी खडसे म्हणाले की, पाच दिवसीय महोत्सवात विविध मंत्र्यांसह खान्देशातील लोकप्रतिनिधी येणार असून मुख्यमंत्रीही येण्याची शक्यता आहे शिवाय राज्यातील उत्कृष्टपणे काम करणार्या 40 महिलांना ‘बहिणाबाई’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
300 बचत गटांची नोंदणी ; अनेक लोकप्रतिनिधी येणार
माजी मंत्री खडसे म्हणाले, चार वर्षांपुर्वी खासदार रक्षा खडसे यांनी या महोत्सवाची संकल्पना मांडली होती. जळगाव येथे झालेल्या महोत्सवाला बचत गटांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि लाखो रुपयांची उलाढाल झाली. महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंसाठी विक्रीची व्यवस्था नसल्याने त्यांच्या मेहनतीला पाहिजे तसे यश मिळत नव्हते. त्यांना यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे असा उद्देश आहे. महोत्सवात तीनशेपेक्षा जास्त बचत गटांची नोंदणी झाली आहे.
जिल्ह्यासह खानदेशातील सर्व आमदारांना महोत्सवासाठी निमंत्रण दिल्यानंतर त्यांनी येण्याचे मान्य केले आहे. मराठा आरक्षणाबाबत महत्वाच्या बैठकी किंवा घडामोडी नसल्या तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही येण्याबाबत होकार दिला आहे तसेच मंत्री गिरीश महाजन, मध्यप्रदेशच्या महिला व बालकल्याण मंत्री अर्चना चिटणीस, मंत्री दिलीप कांबळे, मंत्री गुलाबराव पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, ज्येष्ठ कार्यकर्त्या माधवी नाईक, खासदार हिना गावीत, उदयसिंग पाडवी आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी बहिणाबाईंची कविता एक हजार मुली एका तालासुरात म्हणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परीषदेला यांची उपस्थिती
व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, प्रमोद सावकारे, रजनी सावकारे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, पंचायत समिती सदस्य वंदना उन्हाळे, मनोज बियाणी, सुधाकर जावळे, सविता मकासरे, आदी उपस्थित होते.
जैन ब्रदर्सचा स्टॉल
पर्यटनाना प्रोत्साहन आणि गांधीजींची विचारधारा प्रसारीत करण्यासाठी जैन ब्रदर्सतर्फे स्टॉल लावला जाणार आहे. अशोक जैन यांच्याशी याबाबत बोलणे झाले असून एका कार्यक्रमात ते स्वत: उपस्थित राहतील, असेही खडसे म्हणाले.
बचतगटांना बाजारपेठ मिळणे उद्देश -खासदार
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, महिला बचत गटांना बाजारपेठ मिळणे हा उद्देश असून प्रसंगी बहिणाबाईंच्या पोस्टरचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. ‘खान्देशची लोकधारा’ कार्यक्रमातून सर्वदूर बहिणाबाईंची माहिती पोहोचणार आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे कार्यक्रमास येणार असून त्यांच्या उपस्थितीत पालक-शिक्षक मेळावाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आभार नगराध्यक्ष रमण भोळे यांनी मानले.
विरोधकांच्या टिकेने प्रोत्साहन -खडसे
मुक्ताईनगरातील बेरोजगारांचा मेळावा खासदार रक्षा खडसे यांनी राजकीय स्वार्थासाठी भरवला होता, अशी टिका विरोधकांकडून झाल्यानंतर याबाबत खडसे यांना छेडले असता ते म्हणाले की, विरोधकांच्या टिकेने आम्हाला काम करण्यास अधिकच प्रोत्साहन मिळते. तो भाजपाने आयोजित केलेला मेळावा नव्हता शिवाय विविध कंपन्यांचे प्रतिनिधी तेथे आल्याने एक हजार 300 बेरोजगारांना रोजगार मिळाला. 35 वर्षांच्या राजकीय प्रवासात आठ ते दहा हजार युवकांना नोकर्या लावल्या त्यासाठी कुणाकडून एक रुपयाही घेतला नाही त्यामुळे कदाचित विरोधकांना त्याचे वाईट वाटले असावे व त्यामुळे ते असे आरोप करत असावेत, असेही खडसे म्हणाले.