जळगाव : बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश आचार्य यांनी घालून दिलेल्या आदर्शांवर बँकेची प्रगती सुरु असून समाजातील शेवटच्या घटकाला सक्षम करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. बँकेच्या प्रगतीत बँकेचे स्थापनेपासूनचे सर्व संचालक, सभासद व कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव यांनी बँकेच्या 40 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले. येथील संत बाबा हरदासराम समाज मंदिरात वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आला होती. याप्रसंगी केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, संस्थापक संचालक गजानन चौधरी उपस्थित होते.
महिला सक्षमीकरण
अध्यक्षीय भाषणात अनिल राव यांनी बँकेच्या सभासद,ग्राहक व महिला बचत गटाच्या सभासद महिलांसाठी नवीन योजनांची घोषणा केली. यात महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टिने बँक गृह कर्जातील व्याज दरात महिलांना 1% सुट देणार असून महिला बचत गट सदस्य महिलांनी जर 12 वी नंतरचे शिक्षण घेतले तर त्याचा निम्मा खर्च बँकेमार्फत अदा केला जाईल. बचत गट सदस्य महिलांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी बाजारपेठीची निर्मिती करण्यात येणार असून त्यामुळे बचत गटांनी तयार केलेल्या मालाच्या विक्रीस हक्काची बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. यासोबतच कर्मचारी वर्गासाठी सुविधा देखील देण्यात आली आहे.
मुख्य कार्यालयाची इमारत साकारणार
2020 पर्यंत सर्व सुविधांनी युक्त अशी बँकेची भव्य अशी स्वमालकीची मुख्य कार्यालयाची भव्य वास्तू ग्राहकांच्या सेवेत सुरु होणार आहे. बँक सभासदांच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची रक्कम स्वतः भरत असल्याने जास्तीत जास्त सभासदांनी सदर योजनेचे फॉर्म भरून द्यावेत व याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील अनिल राव यांनी केले. बँकेचे सभासद कर्जदार व ग्राहक यांना नैसर्गिक आपत्तीमुळे व्यवसायात येणा-या अनिष्ट प्रसंगातून सावरण्यासाठी त्यांच्या कर्ज योजनेच्या 10% रक्कमेचा बिनव्याजी ओव्हरड्राफ्ट 3 महिन्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.