महिला सुरक्षा कायद्यात बदलाची गरज

0

पुणे : निर्भया प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षिततेसाठी बनविण्यात आलेल्या नवीन कायद्यात बदल करण्याची गरज आहे. सध्याच्या कायद्यानुसार पिडीत महिलेला तीन वेळा अत्याचाराची घटना संक्षिप्तात कथन करावी लागत असल्याने पिडीत महिलेला त्रास होतो. त्यामुळे या कायद्यात संशोधन होण्याची गरज असून, पिडीत महिलेचा जबाब व्हिडिओच्या माध्यमातून दाखविण्यात यावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी केले.

निलिमा तपस्वी लिखित बेटी बचाओ बेटी पढाओ, महिला सुरक्षा कायदा नियम मार्गदर्शिकेचे प्रकाशन व विविध पुरस्कारांचे वितरण गुरुवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, महापौर मुक्ता टिळक, राज्याची माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, खासदार अनिल शिरोळे, मिस इंडिया नवेली देशमुख, कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल, अहिल्या महिला विकास व शैक्षणिक संस्थेचे मनोहर चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी लिज्जत पापडच्या सुमन दरेकर यांना उद्योग पुरस्कार, वीर पत्नी स्वाती संतोष महाडिक यांना सामर्थ्य पुरस्कार, मुंबईच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना रासम यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी जादूई पद्धतीने पुस्तकाचे उदघाटन करून उपस्थितांना जादूचे खेळ दाखवून मोहित केले.

अंमलबजावणी कठोर हवी
अ‍ॅड. निकम म्हणाले, महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदा झाला, तरी त्याची अंमलबजावणी किती कठोरपणे केली जाते, यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. समाज सुसंस्कृत होण्यासाठी समाजाची दृष्टी आणि विचार बदलणे गरजेचे आहे. आजी-आजोबांसारखे मुक्त विद्यापीठ आता हद्दपार केले जात आहे. त्यामुळे भावी पिढीला चांगले काय आणि वाईट काय हे सांगण्यासाठी घरात कोणी शिल्लक नाही.

महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला
उपभोगाची वस्तू म्हणून महिलांकडे पाहणे बंद केले पाहिजे. तिच्या पंखांना बळ देणे गरजेचे आहे. महिलेला समानतेची वागणूक घरापासून मिळणे महत्त्वाचे आहे. देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत महिलेचा सहभाग मोठा आणि महत्त्वाचा आहे. विविध क्षेत्रांत भरारी घेत असताना तिने कुटुंब व समाजाशी नाते तोडलेले नाही, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

महिला सुरक्षेला प्राधान्य
महापौर टिळक म्हणाल्या, महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेतर्फे आगामी काळात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे महिलांची सुरक्षा, स्वसंरक्षणाचे उपक्रम व किशोरवयीन मुलींच्या शारिरीक व मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. यावेळी खा. शिरोळे, दीक्षित, गोयल, देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. निलिमा तपस्वी यांनी प्रास्ताविक केले, तर सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.