महिला होस्टेलकडे जाण्यासाठी बोगदा

0

गुरुमीत रामरहीमच्या कृष्णलीलांचा भंडाफोड

सिरसा : दोन साध्वींवरील बलात्कारप्रकरणी रोहतक तुरुंगात डांबण्यात आलेला डेरा सच्चा सौदा आश्रमाचा प्रमुख गुरुमीत रामरहीम सिंग याच्या कृष्णलीलांचा शनिवारी भंडाफोड झाला. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या निगरानीखाली महसूल, पोलिस प्रशासनाच्यावतीने सिरसा येथील मुख्यालयाची झाडाझडती सुरु असून, त्यात गुरुमीतच्या गुहेपासून महिला होस्टेल व गर्ल्स होस्टेलपर्यंत जाण्याचे दोन बोगदे उघडकीस आले आहेत. प्रत्येकी पाच किलोमीटर अंतराचे हे बोगदे आहेत. या शिवाय, स्फोटकांचा कारखाना व काही शस्त्रेदेखील शोधपथकाला आढळून आली आहेत.

14 मृतदेहांचे परस्पर दान
लखनऊतील जीसीआरजी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या कागदपत्रांच्या तपासणीत जानेवारी ते ऑगस्ट 2017 या दरम्यान डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयातून 14 मृतदेह या खासगी वैद्यकीय महाविद्यालयाला अवैधरीत्या पाठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व प्रक्रियेत कोणतेही नियम अथवा कायद्याचे पालन करण्यात आलेले नाही. याबाबत हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या महासंचालकांना देण्यात आले आहेत. मृतदेह पाठवण्यामागील मुख्य कारण समोर यायलाच हवे. या सर्व प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

साध्वी निवासाकडे जाणारा रस्ता सापडला
शनिवारी शोधमोहिमेत बाबाच्या सिरसा मुख्यालयात अवैध स्फोटके आणि फटाक्यांचा कारखाना आढळून आल असून, या कारखान्याला पोलिसांनी टाळे ठोकले आहे. त्यातील स्फोटके आणि फटाके ताब्यात घेतले आहेत. पंजाबमधून बोलाविण्यात आलेल्या 14 लोहारांनी मुख्यालयातील कार्यालयांचे टाळे तोडले. बाबा रामरहीम ज्या गुहेत ध्यानधारणेला बसायचा त्या गुहेच्या तिसर्‍या मजल्यावर पन्नास फुटाच्या क्षेत्रात खोदाई सुरू करण्यात आली आहे. या गुहेतून मुलींचे होस्टेल आणि साध्वी निवासाकडे जाणारे बोगदे आढळून आलेत. सिरसाचे पोलिस अधिकारी सतीश मेहरा यांनी सांगितले की, जेसीबीच्या मदतीने खोदकाम सुरू करण्यात आले आहे. कार्यालयातून मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. एका व्यक्तीलाही ताब्यात घेतले आहे. हा अनुयायी असून झडतीदरम्यान मोबाईल फोनमध्ये त्याचे चित्रण करत होता.

3000 महागडे ड्रेस, 1500 शूज आणि बरेच काही
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत रामरहीम याच्या सिरसातील आश्रमाच्या झाडाझडतीदरम्यान अनेक डोळे विस्फारून टाकणार्‍या गोष्टी समोर येत आहेत. महागडे तीन हजार ड्रेस, 1500 शूज, अलिशान गाड्या आणि रोख रक्कम असा ऐवज तपासपथकांच्या हाती लागला आहे. यावरून सिरसा आश्रमातील गुहा म्हणजे रामरहीमच्या चैनीचे ठिकाण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या लाईफस्टाईलबद्दल ऐकलेल्या दंतकथा सत्य असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्याच्या खोलीत चारही बाजूंना मोठी कपाटे आहेत. या कपाटांमध्ये या वस्तू होत्या.