भुसावळ । तालुक्यातील कंडारी येथे एका 45 वर्षीय परिचारिका महिलेचा राहत्या घराच्या छतावर संशयास्पदरित्या जळून मृत्यू झाल्याची घटना सोमवार 13 रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून याबाबत मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नसून खुन किंवा आत्महत्या याबद्दल तर्कविर्तक लावले जात आहे. घटनास्थळी पोलीस हेडकॉन्स्टेबल समाधान पाटील, सोपान पवार, गाडगीड हे उपस्थित होते. याबाबत पोलीस पाटील रामा तायडे यांनी दिलेल्या खबरीवरुन शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका खैरनार करीत आहे.
घराच्या छतावर जळाल्याने झाला मृत्यू
कंडारी येथील महाजन वाडा परिसरातील रहिवासी महिला रंजना शामराव रामटेके (वय 45) यांचा घराच्या छतावर जळाल्याने मृत्यू झाला. शेजारील तरुणी घराच्या छतावर वाळलेले कपडे काढण्यासाठी गेल्या असता याठिकाणी जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने आरडा- ओरड होऊन या घटनेची वार्ता संपुर्ण गावात वार्यासारखी पसरली. परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. पोलीस पाटील रामा तायडे यांनी या घटनेची माहिती पोलीसांना दिली असता शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे, एपीआय सारीका खैरनार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी पोलीसांनी स्थानिक रहिवाशांना घटनेबद्दल विचारणा केली असता कुणालाही काही एक माहिती नसल्याचे सांगण्यात आले. मात्र सदर महिलेची फारकत झाल्यामुळे ती आपले माहेर असलेल्या कंडारी येथे येऊन महाजन वाड्यात 2009 पासून येथे भाड्याने रहिवास करीत होत्या. जळगाव येथील आर्किड हॉस्पीटलमध्ये त्या परिचारिका म्हणून कामावर होत्या. पोलीसांनी पाहणी केली असता घरातील स्टोव्हचे झाकण उघड्याअवस्थेत आढळून आले. संशयीत तरूणाबाबत कुणालाही काही एक माहिती नसल्यामुळे पोलीसांनी घरातील दोघांचा सोबत असलेला फोटो ताब्यात घेतला असून यावरुन तरुणाचा शोध घेतला जात आहे. घरमालकाने दिलेल्या माहितीनुसार सदर तरुण हा दीपनगर येथे कंत्राटदाराकडे कामावर असल्याचे सांगितले.
एका तरूणावर संशय
पोलिसांनाी घरात पोलिसांनी कसून तापासणी केली असता. त्यांच्या मोबाईलवरून एक तरूणीशी संभाषण झाल्याचे निदर्शनास दिसून आले आहे. सदरील घटनेमुळे हा तरूण फरार झाल्याचे पोलसांनी सांगितले. मोबाईलच्या संभाषणावरून दोघांमध्ये भांडण झाल्याचे दिसून आले आहे. या घटनेमुळे परीसरात एकच हळहळ व्यक्त होत असून कांडारी गावातील नागरीकांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहे. पोलिस पाटील यांच्या खबरीवरून शहर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका खैरनार करीत आहे.