महिलेची निर्घृण हत्या : आरोपींना 6 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Malkapur woman killed for gold jewellery: Father and son jailed for four days मुक्ताईनगर : कुंड गावाजवळ खून झालेल्या महिला मलकापूर नगरपरीषदेमधील सेवानिवृत्त कर्मचारी महिला प्रभा माधव फाळके (63, रा.गणपती नगर) असून मलकापूर येथील संशयीत पिता-पूत्रांनी सोन्याच्या दागिण्यांसाठी महिलेची हत्या केल्याची बाब प्रथमदर्शनी उघड झाली आहे. मलकापूर येथील पिता-पूत्रांना मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केल्यानंतर संशयीतांना शुक्रवारी मुक्ताईनगर न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हत्या करीत फेकला मृतदेह
प्रभा फाळके यांची अतिशय क्रुरपणे हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह हा जाड प्लास्टीकच्या कॅरीबॅगमध्ये भरून मुक्ताईनगर ते बर्‍हाणपूर महामार्गावर संत मुक्ताबाई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणार्‍या पुलाच्या खालील बाजूस 29 ऑगस्ट रोजी फेकण्यात आला होता. प्रभा माधव फाळके या 27 ऑगस्ट रोजी परीसरातच असलेल्या मंदिरामध्ये पुजेची थैली घेवून दर्शनासाठी जात असल्याचे मुलाला व सुनेला सांगून घरून निघून गेल्या होत्या परंतु त्यानंतर त्या घरी परतल्या नव्हत्या. सोशल मिडीयाद्वारे मयताचा मुलगा रीतेश माधव फाळके याने आईची ओळख पटवली होती तर तांत्रिक तपासाअंती फाळके यांच्या घराशेजारी राहणार्‍या विश्वास भास्कर गाढे (50) आणि भार्गव विश्वास गाढे (21, रा.गणपती नगर, मलकापूर) यांनी हत्या केल्याची बाब पोलिस तपासात पुढे आल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.

सीसीटीव्हीत दिसले संशयीत
प्रभा फालके यांचे गाढे परीवारासोबत कौटुंबिक संबंध होते. त्यातच प्रभा फाळके यांना शेवटचा फोन भार्गव गाढे याने केला होता. त्यानुसार त्यांनी भार्गवच्या फोनची माहिती काढली तर तो घटनेच्या दिवशी मृतदेह आढळला त्या परीसरात असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे निरीक्षक शेळके यांनी मलकापूर ते घोडसगावमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात पिता-पूत्र दुचाकीवरून मृतदेह घेऊन जाताना स्पष्ट दिसून आले तर भार्गव गाढेचा मोबाईलचा सीडीआरमध्ये मुथूट गोल्ड फायनान्सचे काही मॅसेज दिसल्यानंतर आरोपीने मयताच्या अंगावरील सोने गहाण ठेवून त्याद्वारे कर्ज घेतल्याची बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधित फायनान्स कंपनीला आता पत्र दिले आहे.

अशी दिली खुनाची कबुली
सर्व पुरावे समोर ठेवूनही भार्गव खुनाची कबुली देत नव्हता. शेवटी खाक्या दाखवताच त्याने सर्व हकीगत सांगितली. वडिलांना दारूचे व्यसन आहे. तसेच माझ्यावरही पन्नास हजाराचे कर्ज होते. तशात वडिलांनी दारूच्या नशेत 27 तारखेला प्रभा फाळके यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून ठार करत अंगावरचे सोने काढून घेतले. त्यानंतर मृतदेहाचे गासोडे बांधत फेकून दिले. दरम्यान, आरोपींना शुक्रवारी न्यायालयाने चार दिवसांची (6 सप्टेंबरपर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.