औरंगाबाद- औरंगाबादमध्ये एका महिलेच्या तक्रारीने गर्भपात केंद्राचा पर्दाफाश झाल्याची घटना समोर आली आहे. साहेब, पतीने पाच दिवसांपूर्वी माझा जबरदस्तीने गर्भपात केला. सहा आठवड्यांचा माझा गर्भ मारून टाकला, अशी तक्रार घेऊन 25 वर्षीय महिला पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे आली. हे बेकायदा गर्भपात केंद्र दोन वर्षांपासून जिन्सी पोलिस ठाण्यापासून 200 मीटर अंतरावरच सुरू असल्याचे लक्षात येताच यादव गंभीर झाले. त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले आणि रनमस्तपुरा भागातील या केंद्रावर बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास छापा टाकण्यात आला.
सुमैयाचा (रा. किलेअर्क) गर्भ 19 मे रोजी तिचा पती सय्यद सलाहउद्दीन सय्यद शहाबुद्दीनने याच केंद्रात नेऊन पाडला. त्यानंतर तिने या केंद्राचा भंडाफोड करण्याचे ठरवले होते. तिने आईवडिलांना सोबत घेऊन थेट पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यादव यांच्या आदेशावरून जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर, उपनिरीक्षक वर्षा काळे यांनी सापळा रचला.
बनावट रुग्ण म्हणून गेलेल्या कर्मचार्यांनी इशारा करताच बाहेर दबा धरून बसलेल्या पथकाने छापा मारून गायकवाड, सातदिवेला ताब्यात घेऊन गर्भपातासाठी वापरले जाणारे सर्व साहित्य जप्त केले. सुमैयाचा पती सय्यद सलाहउद्दीनविरुद्ध बळजबरीने गर्भपातास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले. हे मोठे रॅकेट असून त्यात शहरातील अनेक डॉक्टरांचा सहभाग असावा, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.
पाच-सहावर्षांपासून सुरू होता गैरप्रकार
रनमस्तपुर्यातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड गेल्या पाच ते सहा वर्षांपासून व्यवसाय करतात. हे घर त्यांनी भाड्याने घेतले होते. काहींना त्याची माहिती होती, परंतु कोणीही पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. गर्भपात केंद्रासमोरील औषधी दुकानदारही या गोरखधंद्यात सहभागी असावा असा संशय आहे.
गर्भाची विल्हेवाट स्वच्छतागृहात
प्राथमिक चौकशीत गर्भपात केल्यानंतर गर्भ नातेवाइकांकडे दिला जाई असे समोर आले आहे. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दवाखान्यातील स्वच्छतागृहात (बाथरूम) गर्भाची विल्हेवाट लावली जात होती. दररोज पाच ते सहा महिला येथे तपासणीसाठी येत होत्या.