गणपती नगरातील वर्दळीच्या रस्त्यावरील भरदिवसाची घटना: रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव : शहरात सर्वत्र मकरसंक्रांत साजरी होत असतांना दुसरीकडे याच दिवशी सायंकाळी 4 वाजेच्या गणपती नगरात घरात एकट्या असलेल्या उद्योजकाच्या पत्नीला दोन जणांसह एका महिला अशा तिघांनी घरात घुसून मारहाण केली. यानंतर तिला विवस्त्र करुन बांधून ठेवून तिचे मोबाईलमध्ये फोटो काढून धमकी दिली. तसेच घरातील 4 लाखांची रोकड व दागिणे तसेच मालमत्तेची कागदपत्रे असा 5 लाख 300 रुपयांचा ऐवज लांबवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हायप्रोपाईल समजल्या जाणार्या शहरातील गणपतीनगरात वर्दळीच्या रस्त्यावरील अपार्टमेंटमध्ये सिनेस्टाईल भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांचा धाक संपला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान घटनेला दोन दिवस उलटलेले असले तरी महिला प्रचंड घाबरलेली होती.
घर भाड्याचे द्यायचे का म्हणत घुसले घरात
याबाबत माहिती अशी की, काव्यरत्नवाली ते डीमार्ट दरम्यानच्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये उद्योजक पत्नी व वडील या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. एमआयडीसीमध्ये त्यांची चटईची कंपनी आहे. 15 जानेवारी संक्रातीच्या पती नेहमीप्रमाणे त्यांच्या कंपनीत गेले होते. त्यामुळे पत्नी घरी एकटी होती. सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास अज्ञात दोन व्यक्तीसह एक महिला असे तिघे आले. तुम्हाला घर भाड्याने द्यायचे आहे, का असे म्हणत घरात घुसले. संशयिताच्या सोबत असलेल्या महिलेने घरातील उद्योजकाची पत्नी यास पाणी मागितले. पाणी घ्यावयास किचन मध्ये जाताच तिच्या डोक्यात मारहाण केली. त्यामुळे उद्योजकाची पत्नी बेशुध्द पडली. यानंतर तिघांनी मिळून बेशुध्द महिलेचे दोन्ही हात पाठीमागे बांधून घरातील टीपॉयला दोरीने बांधले. यानंतर तोंड ओढणीने बांधले.
महिलेचे विवस्त्र फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी
आरडाओरड करु नये म्हणून चोरट्यांनी तोंड ओढणीने बांधल्यावर महिलेने उद्योजकाच्या पत्नीेच्या अंगावरील सर्व कपडे काढले. यानंतर एकाने तिचे विवस्त्र अवस्थेत असलेले फोटो मोबाईलमध्ये काढले. पोलिसांना अथवा इतर कोणालाही प्रकार सांगितल्यास विवस्त्र असलेले सर्व फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. तास भर संशयित घरात होते. यादरम्यान संशयित येणार्या फोनवर मराठीत बोलत होते. तसेच उद्योजकाच्या पत्नीला उद्देशून बोलत असतांना तोडक्या हिंदीत बोलत होते. या वारंवार तुमने लोगो का प्रॉपर्टी हडप की है, तुम्हे अब बताते है, कैसे हडप किया जाता है, असे संशयित बोलत होते.
भरदिवसाची घटना अन् अपार्टमेंटमधील रहिवासीही अनभिज्ञ
शुक्रवारी सकाळी महिलेच्या पतीने तक्रारीसाठी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठल्यावर ही घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांच्यासह रामानंदनगरचे पोलीस निरिक्षक तसेच गुन्हे शोध पथकातील कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठले. महिलेची चौकशी करुन मारहाण करण्यांचे वर्णन तसेच इतर माहिती जाणून घेतली. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. विशेष म्हणजे या अपार्टमेंटमधील रहिवासी शेजारील नागरिकांना दोन दिवस उलटूनही घटनेबद्दल कुठलीही माहिती नव्हती. पोलीस आल्यावर त्यांनाही घटनेची माहिती मिळाली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोन लावू नये म्हणून मोबाईलही लांबविला
यानंतर संशयितांनी उद्योजकाच्या विवस्त्र बांधून ठेवलेल्या पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिणे तसेच कपाटातील रोख रक्कम, प्रॉपर्टीचे कागदपत्रे लांबविली. यात संशयितांनी घरातून 4 लाख रुपये रोख, 60 हजार रुपये किमतीचे 4 तोळे सोन्याच्या 4 बांगड्या, 15 हजार रुपये किमतीचे 1 तोळे वजनाचे मंगळसूत्र, 15 हजार रुपये किमतीचे 6 सोन्याच्या अंगठ्या यासोबत बाहेर पडल्यावर पत्नीने फोन लावू नये म्हणून संशयितांनी तिचा 10 हजार रुपयांचा मोबाईल आणि प्लॅटचे मूळ खरेदीखताने कागदत्रे व 100 रुपयाचे 3 300 रुपयांचे स्टॅम्प पेपर असा एकूण 5 लाख 300 रुपयांचा ऐवज लांबविला.
पत्नीचा फोन बंद येत होता म्हणून प्रकार झाला उघड
एकटीच घरी असलेल्या पत्नीचा सायंकाळपर्यंत कुठलाही फोन आल्याने उद्योजक पती याने घराशेजारी असलेल्या त्यांच्या भाडेकरुला फोन लावला. व पत्नीला फोन लागत नसल्याचे सांगून घरी जावून बघ असे सांगितले. त्यानुसार भाडेकरु उद्योजकाच्या घरी गेला. त्याने उद्योजकाला पुन्हा फोन करुन बेल वाजल्यावर कुणीही प्रतिसाद तसेच दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. यानंतर उद्योजकाने भाडेकरुला पुन्हा घरी पाठविले. यानंतर भाडेकरुने बेल वाजविली. अन् घरातील उद्योजकाच्या पत्नीने अर्धवट दरवाजा उघडला. व भाडेकरुच्या फोनवरुन पतीला तुम्ही जिथे असाल घरी परत या, असे सांगितले. त्यानुसार पती काळजीने घरी पोहचले असता, तीन जणांनी मारहाण तसेच विवस्त्र करुन दागिणे रोकड, लांबविल्याची आपबिती पत्नीने पतीला सांगितली. मात्र फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने याबाबत दाम्पत्याने तक्रार दिली नाही. मात्र हा प्रकार वडीलांना सांगितल्यानंतर त्यांनी हिंमत दिल्यावर पतीने तक्रारीसाठी शुक्रवारी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले.
शासकीय कर्मचार्यावर हल्ला करणार्या संशयिताला 34 वर्षानंतर एलसीबीने पकडले
जळगाव। पाणी सोडण्याच्या कारणावरुन शासकीय कर्मचार्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेतील संशयिताला अटक करण्यात आली होती. यानंतर सुटका झाल्यावर तो पुन्हा न्यायालयीन तारखांवर हजर राहत नव्हता. 34 वर्षापासून फरार संशयित रमेश एच.पाटील रा. भडगाव यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
अनेक वर्षापासून फरार जिल्ह्यातील संशयितांना अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांना मार्गदर्शन व सुचना केल्या आहेत. त्यानुसार भडगाव येथील शासकीय कामात अडथळ्याच्या गुन्ह्यातील फरार संशयित रमेश पाटील यांच्या शोधार्थ रोहम यांनी सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, विनोद पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र पाटील, प्रविण हिवराळे या या पथकाला रवाना केले होते. पथकाने भडगाव, पाचोरा चाळीसगाव या तालुक्यातील विविध गावांमध्ये जावून सलग 15 दिवस विविध नागरिकांच्या भेटी घेतल्या. व माहिती मिळवली. यात त्यानुसार रमेश पाटील हा गुजरात राज्यातील उधना शहरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने उधना येथून संशयित रमेश यास ताब्यात घेतले. पुढील तपासकामी त्यास भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.