महिलेला मारहाण करून विवस्त्र अवस्थेत बांधून ठेवत 4 लाख लांबविले !

0

जळगाव:शहरात सर्वत्र मकरसंक्रांत साजरी होत असतांना दुसरीकडे याच दिवशी सायंकाळी 4 वाजेच्या गणपती नगरात घरात एकट्या असलेल्या महिलेला दोन जणांसह एका महिला अशा तिघांनी घरात घुसून बेदम मारहाण केली. यानंतर तिला विवस्त्र करुन बांधून ठेवत घरातील 4 लाखांची रोकड व दागिणे तसेच मालमत्तेची कागदपत्रे असा ऐवज लांबवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हायप्रोपाईल समजल्या जाणार्‍या शहरातील गणपतीनगरात वर्दळीच्या रस्त्यावरील अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांचा धाक संपला की काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान घटनेला दोन दिवस उलटलेले असले तरी महिला प्रचंड घाबरलेली होती.

घटनेनंतर महिला प्रचंड घाबरलेली होती. हल्ला करुन रोकड लांबविणार्‍या भितीने तक्रार द्यावी की देवू नये या मानसिकतेत महिला होती. शुक्रवारी सकाळी दाम्पत्याचा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय झाला. महिलेच्या पतीने तक्रारीसाठी पोलीस ठाणे गाठल्यावर ही घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांच्यासह रामानंदनगरचे पोलीस निरिक्षक तसेच गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. महिलेची चौकशी करुन मारहाण करण्यांचे वर्णन तसेच इतर माहिती जाणून घेतली. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. विशेष म्हणजे या अपार्टमेंटमधील रहिवासी शेजारील नागरिकांना दोन दिवस उलटूनही घटनेबद्दल कुठलीही माहिती नव्हती. पोलीस आल्यावर त्यांनाही घटनेची माहिती मिळाली.