जळगाव – यावल तालुक्यातील मोहराळे येथे गल्लीतच राहत असलेल्या महिलेसह तिच्या मुलीचे मोबाईल क्रमांकावरुन बनावट अकाऊंट तयार करणार्या संशयिताला सायबर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. ललीत संजय महाजन रा. मोहराळे असे त्याचे नाव असून तो विवाहित असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी एका तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र त्याचा सहभाग नसल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याला सोडून देण्यात आले.
मोहराळे येथे पुष्पा कैलास पाटील ह्या पती, मुलगा तसेच मुलीसह वास्तव्यास आहेत. 17 मार्च रोजी त्यांना गावातील एका इसमाने तुमचे तसेच मुलीचे फेसबुक अकाऊंट असल्याची माहिती दिली. पुष्पा यांनी त्याला आम्ही फेसबुक अकाऊंट उघडले नसल्याचे सांगितले. स्वतः फेसबुक तपासले असता मुलाचा प्रोफाईल फोटा असलेले पुष्पा पाटील यांच्या नावाने दोन खाते तर मुलीच्या नावाने एक खाते तयार असल्याचे लक्षात आले. संमतीवाचून कुणीतरी अज्ञात इसमाने हा प्रकार केल्याचे लक्षात आल्यावर 19 मार्च 2019 रोजी पुष्पा यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरुन अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मोबाईल क्रमांकावरुन लागला छडा
गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अरुण पाटील यांनी तपासचक्रे फिरविली. तपासात मोबाईल क्रमांकांचा वापर करुन बनावट खाते तयार केल्याच्या समोर आले. या मोबाईल क्रमांकाची माहिती तपासल्यावर हा मोहराळे येथील तसेच गल्लीतच राहणार्या ललीत महाजनचे नाव निष्पन्न झाले. निकम यांनी शंभूदेव रणखांब, अजय सपकाळे, स्वाती पाटील यांचे पथकाला त्याला अटक करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने मोहराळे येथून ललीत महाजन यास अटक केली. महाजन हा शेती करतो. तो विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची माहिती मिळाली आहे. त्याने नेमका हा प्रकार का केला? हे कळू शकलेले नाही.