चेन्नई । दोन वर्षापूर्वी झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या वृत्तांकनासाठी ऑस्ट्रेलियात गेलेल्या भारतीय क्रीडा पत्रकारांनी सांगितलेला एक किस्सा सांगितला. विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना संपल्यावर पत्रकार परिषदेसाठी पत्रकार जात होते. त्यावेळी तिथून शेन वॉर्न गेला. जाता जाता त्याने परिचयाच्या असलेल्या एका भारतीय पत्रकाराला थेट प्रश्न केला, तुमच्या कर्णधाराला विचारा तो मैदानात काय करत होता?. हा प्रश्न विचारुन वॉर्नने सरळ सरळ धोनीकडे इशारा केला होता.
त्या महत्वाच्या सामन्यात धोनीने 94 चेंडूत केवळ 65 धावा केल्या होत्या. हा सामना भारत 95 धावांनी हरला होता. जाहिर आहे की त्यावेळी धोनीला कोणीच हा प्रश्न विचारला नाही. परंतु आता अडीच वर्षांनी पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित झाला आहे की धोनीला पुन्हा तसाच मॅच फिनीशर बनायचे आहे का? वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात धोनी शेवटच्या षटकात सामना संपवण्याच्या दृष्टीने खेळ केला होता. पण त्यात तो यशस्वी ठरला नाही आणि भारताने तो सामना 11 धावांनी गमावला. त्या सामन्यातल्या खेळपट्टीचा अंदाज बांधणे कठीण होत हे नक्की. पण, ती फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरेल एवढी धोकादायकही नव्हती. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात स्वत: मोठे शॉट्स खेळण्याऐवजी धोनी जडेजा आणि हार्दिक पंड्याकडून ती अपेक्शा बाळगून होता. त्यावेळी पंड्याने 21 चेंडूत 20 आणि जडेजाने 11 चेंडूत 11 धावा काढल्या. या दोघांचा स्ट्राईक रेट 100 होता. त्याचवेळी केवळ 50 स्ट्राईक रेटने खेळणार्या धोनीने या डावात केवळ एकच चौकार मारला होता. त्यामुळे धोनीच्या बाबतीत संघ व्यवस्थापन किंवा बीसीसीआयने ठोस निर्णय घ्यावा अशी चर्चा रंगली आहे.
पूर्वीचा धोनी संपला ?
सामना शेवटच्या षटकांपर्यंत लांबवून अचानक एक मोठा फटका खेळून सामन्याचा निकाल लावायचा हे धोनीच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य होते. रविवारच्या सामन्यात त्याने तसा प्रयत्न केला पण त्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे पुर्वीचा मॅच फिनीशर धोनी आता राहिलेला नाही हे स्पष्ट होते. पण निवड समितीचा माजी सदस्य आणि माजी यष्टीरक्शक साबा करिमने मात्र धोनीचा बचाव केला आहे. करिम म्हणाला की, वाढत्या वयाप्रमाणे पहिल्या सारखा चांगला खेळ न होणे स्वाभाविक आहे.
धोनीही अपवाद नाही
भारतीय संघातील बड्या खेळाडूंचे एक दुखणे आहे. त्यांना आपला काळ आता संपलेला आहे याची जाणिवच होत नाही. आधीच्या पुण्याईवर ते संघातील जागा राखण्याचा विचार ते करतात. महेंद्रसिंग धोनीही त्याला अपवाद राहिलेला नाही हे आता स्पष्ट होत आहे. रविवारचा सामना सोडून द्या. पण मागील काही सामन्यांकडे नजर टाकल्यावर धोनीने चांगल्या खेळी केलेल्या नाहीत हे स्पष्ट होते. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना हे त्याचे चांगले उदाहरण आहे. भारताची खराब सुरुावत झाली हे मान्य आहे. समोर धावांचे मोठे आव्हान असताना, मोठे फटके खेळून धावा जमवण्याचा प्रयत्न करतानाही धोनी दिसला नाही. हाच धोनी सध्या मधल्या फळीत दिशादर्शक फलंदाजाची भूमिका वठवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे त्याचा सध्याचा खेळ चिंता वाढवणारा नक्कीच आहे. आयपीएलच्या यंदाच्या सत्रातील अंतिम सामन्याचे बघा ना? मुंबईच्या छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना त्याच्या संघाला फिनीशर धोनीची आवश्यकता होती का?
रुषभ पंत आणि इतरांना संधी केव्हा?
साबा करिम म्हणतात त्याप्रमाणे आगामी विश्वचषक स्पर्धेपर्यंत धोनीने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणे फायदेशीर आहे का? सध्याच्या परिस्थितीत त्यात काही दम नाही असेच म्हणावे लागेल. धोनी चांगला यष्टीरक्शक आहे. त्याला खेळाची चांगली समज आहे पण त्याची फलंदाजी चांगली होत नाही. इतर खेळाडूंप्रमाणे रुषभ पंतही संघात निवड होण्याची वाट बघतोय. दिल्लीच्या या युवा क्रिकेटपटूने चांगली छाप पाडली आहे. पण भारतीय संघ व्यवस्थापन त्याला संधी देण्यात कचरतेय हे खरे आहे.