कोल्हापूर-अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये जाणार असे बोलले जात आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांनी मांजरेकर यांच्याबद्दल सूचक विधान केले आहे. महेश मांजरेकर हे काँग्रेसमध्ये आल्यास आम्हाला आनंदच होईल अशी खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. आज कोल्हापुरात मांजरेकर यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतली.
अशोक चव्हाण आणि महेश मांजरेकर हे कॉलेजपासूनचे मित्र आहेत. अशोक चव्हाण यांची भेट महेश मांजरेकरांनी घेतल्यामुळे मांजरेकर काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
महेश मांजेरकर हे पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा साकारत आहेत. यासंदर्भातल्या शूटिंगसाठी ते कोल्हापुरात आले होते. कोल्हापुरातच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आहेत. कारण सरकारविरोधातली जनसंघर्ष यात्रा सध्या कोल्हापुरात आहे. महेश मांजरेकर यांना ही गोष्ट समजल्यावर ते अशोक चव्हाण यांना भेटण्यासाठी गेले. या दोघांमध्ये बराच वेळ अनौपचारिक गप्पा झाल्या. महेश मांजरेकरांनी काही महिन्यांपूर्वीच मनसेला रामराम केला.