माँ बगलामुखी देवीचे राज ठाकरेंनी घेतले दर्शन

0

दतिया । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशभरातील दिग्गज राजकारण्यांचे श्रद्धास्थान असलेल्या मध्य प्रदेशातील दतिया येथील माँ बगलामुखी देवीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे विविध क्षेत्रांत तसेच राजकारणात अपयश आलेले लोक या देवीचे दर्शन घेऊन यश प्राप्त करतात, अशी आख्यायिका सांगितली जाते.

पराभवाच्या चक्रातून बाहेर पडण्याठी प्रयत्न
राज्यातील विधानसभा आणि नुकत्याच पार पडलेल्या मुंबईसह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीत मनसेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. राज ठाकरे यांच्या करिश्मामुळे मनसेची वाटचाल जोरात सुरू झाली होती. राज यांच्या सभेला लाखोंची गर्दी होत होती. सुरुवातीला मतेही मिळत गेली. पण पक्षबांधणीकडे म्हणावे तेवढे लक्ष देता आले नाही. त्यामुळे लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत मोठा फटका बसल्याचे मनसेच्या नेत्यांना वाटते. सातत्याने पराभवाला सामोरे जाणार्‍या मनसेला फिनिक्स पक्ष्यासारखी राखेतून भरारी घेण्यासाठी पक्षबांधणी आणि पक्षविस्तारावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे.

अमित शाह यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांनी टेकला होता माथा
त्या दिशेने वाटचालही सुरू झाली आहे. ती सुरू असतानाच आता राज ठाकरे यांनी देशभरातील राजकारण्यांचे श्रद्धास्थान असलेल्या मध्य प्रदेशातील बगलामुखी देवीचे दर्शन घेतले आहेत. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांनी या देवीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर प्रचाराला सुरूवात केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यामुळे राज ठाकरे यांनाही भविष्यात होणार्‍या निवडणुकांमध्ये अशाच प्रकारचे यश मिळेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.