मांडळ येथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांची भेट

0

अमळनेर । तालुक्यातील मांडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामस्थानीं कुलूप लावून आरोग्य कर्मचार्‍यांविषयी संताप व्यक्त करण्याचा प्रकार गुरुवारी 10 रोजी घडला. घटनेची माहिती जाणुन घेण्यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. त्यांनी आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा जबाब नोंदवून घेतले. मांडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेस एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने धुळे येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते.

या आधी ही दोन ते तीन महिलसोबत असा प्रकार घडला असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत प्राथमिक आरोग्य केंद्रास कुलूप लावले. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचा पवित्र घेतला होता. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डी.एस पटोळे यांनी शनिवारी 12 रोजी मांडळ येथील प्राथमिक आरोग्य केद्रास भेट देवून झालेल्या प्रकाराबाबत अधिकारी व कर्मचारी यांची चांगलीच झाडाझडती घेतली. सर्व कर्मचार्‍यांचे जबाब नोंदवून संतप्त झालेल्या ग्रामस्थांशी ही चर्चा करून त्यांचा ही जबाब घेतला आहे. घटनेची चौकशी करून तसा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर केला जाईल असे डॉ.पटोळे यांनी सांगितले.