मांडुळ सापाची तस्करी करणार्‍या दोघांना अटक

0

पुणे । जिवंत मांडूळाची तस्करी केल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील दोन मांडूळांची सुखरूप सुटका केली आहे. गणेश वाफगावकर (वय 18) आणि राजु शिळीमकर (वय 40) अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर वन्यजीव कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपआयुक्त पंकज डहाणे यांनी दिली.

कात्रज परिसरात दोन इसम मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना खबर्‍याकडून मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. वनविभागाचे पोलिस उपनिरीक्षक कदम आणि गुन्हे शाखा 1 च्या पथकाने कात्रज चौकात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये 1 किलो 500 ग्रॅम आणि 1 किलो 400 ग्रॅम वजनाचे दोन मांडूळ आढळले. या मांडूळाची बाजारभावातील किंमत 50 लाख रुपये इतकी असल्याचा दावा पोलिसांनी केला. पोलिसांनी दोन्ही मांडूळ ताब्यात घेत आरोपींना अटक केली.

जादुटोणा करण्यासाठी मांडूळाचा वापर
गडद-तपकीरी काळसर रंगाच्या या मांडूळ सापांबाबत अनेक गैरसमज आहेत आणि म्हणूनच त्याची तस्करी केली जाते. हा मांडूळ गुप्तधनाचा शोध लावतो असाही गैरसमज आहे. तसेच औषध आणि जादुटोणा करण्यासाठीही या मांडूळाचा वापर केला जातो, मांडूळाची पूजा करून सोडल्यानंतर तो गुप्तधनाचा शोध लावतो, अमावस्येच्या दिवशी घरात ठेवल्यामुळे धनप्राप्ती होते, तसेच जमिनीमध्ये दडवून ठेवलेले गुप्तधन बाहेर येते अशा प्रकारच्या अंधश्रध्दा या सापाविषयी आहेत.