अंधश्रद्धेमुळे जास्त मागणी
वाकड : मांडूळ सापाबद्दल बरेच गैरसमज व अंधश्रद्धा असल्याने त्यास मोठ्या प्रमाणात किंमत मोजण्यासाठी ग्राहक तयार असतात. एक मांडूळ किमान दहा हजार तर जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंत सुद्धा घेण्याची काही जणांची तयारी असते. त्यामुळे मांडूळ जातीच्या सापाची तस्करी केली जाते. मांडूळ विक्री करणार्या चार जणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई वाकड मधील मुंजोबा वसाहत येथे करण्यात आली. अमर अरुण राठोड (वय 19), बाबासाहेब वसंत रोकडे (वय 21), भीमराव नरसप्पा जाधव (वय 22, तिघे रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) आणि सागर चंद्रकांत घुगे (वय 22, रा. गजानन कॉलनी, ताथवडे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
शहरात वाढत असलेल्या घरफोड्या, चेन चोरी, वाहनचोरी अशा गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी वाकड पोलिसांनी गस्ती पथके नेमली आहेत. गस्ती पथकातील पोलिस नाईक राजेश बारशिंगे यांना मुंजोबा वसाहत येथील मुंजोबा मंदिराच्या मागील बाजूला मांडूळ विक्री करणारी टोळी येणार असल्याची माहिती मिळाली. वाकड पोलिसांनी त्या माहितीच्या आधारे मंदिराच्या मागील बाजूला सापळा लावला. मंदिराच्या मागील बाजूला चौघेजण संशयितरित्या उभा राहिलेले आढळून आले. त्यातील एकाच्या हातात पोते होते. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या पोत्यामध्ये तीन मांडूळ जातीचे साप असल्याचे आढळून आले. त्यानुसार चौघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने, पोलिस उपनिरीक्षक हरीश माने, कर्मचारी राजेश बारशिंगे, अशोक दुधवणे, बापू धुमाळ, रमेश गायकवाड, विक्रांत गायकवाड, भैरोबा यादव, विजय गंभीरे, शाम बाबा यांच्या पथकाने केली.