मुक्ताईनगर । कुर्हा परिसरात मांडूळ साप विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तस्करास गोपनीय माहितीवरुन पोलीसांनी 23 रोजी कारवाई करीत या तस्करास पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. या घटनेवरुन पुन्हा एकदा या परिसरात बनावट नागमणी अनेक गोरखधंदे मांडूळ साप (डबल इंजन) विक्रीचे अनेक अवैध धंदे बिनधास्त सुरु असल्याचे सिध्द झाले आहे. कुर्हा परिसरात मांडूळ साप व अनेक गोरखधंदे सर्रास सुरु असतात मात्र याकडे पोलीस व वनविभाग जाणिवपुर्वक दुर्लक्ष करतात. त्यामुळेच वनपरिसरात तस्करांचा सुळसुळाट सुरु असल्याचे दिसते.
दिवसाढवळ्या केली जाते सापांची विक्री
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले मोरझीरा, मधापुरी, लालगोटा, हालखेडा जोंधनखेडा या आदिवासी गावांमध्ये मांडूळ तस्करी, बनावट नागमणी असे अनेक लुबाडण्याचे असे धनधाडग्यांकडून पैसे लुटमारीचे अवैध धंद्यांना ऊत आला आहे. दिवसा मांडूळ सापविक्रीसाठी पिशव्यांमध्ये फिरतानांचे चित्र आहे. पोलीस, वनविभागाच्या काही अधिकार्यांच्या आशिर्वादाने सुरु असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. एखाद्या कर्तव्य पोलिस अधिकार्याने लक्ष देण्याची मागणी पुढे येत आहे. 23 रोजी सायंकाळी 6 वाजता मुक्ताईनगर तालुक्यातील मोरझीरा येथील रहिवाशी रायसिंग आत्माराम राठोड (वय 30) हा मधापुरी ते मोरझीरा रस्त्यावर मांडूळ साप (डबल इंजन) विकणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली पोलिसांनी संशयितांवर झडप घालून पकडले. त्यांच्या जवळून एक मांडूळ जातीचा साप हस्तगत केला. तसेच त्यांच्याविरुध्द वन्यजीव (संस्था) अधिनियमानुसार मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वडोदा वनक्षेत्रपाल बी.बी. जोमीवाले यांनी संशयितास अटक केली आहे. याच परिसरात मागील काही वर्षी उमरा गावी मांडूळ आणि बनावट नागमणी घेण्याच्या वादातुन गोळीबारीचा प्रकार घडला होता. तसेच जोंधनखेडा परिसरात नागमणी घेण्यासाठी आलेल्या पार्टीला लाखो रुपयांनी लुटले होते. पार्टी लुटल्यानंतर कुर्हा परिसरात पोलिसांना सदर हिस्सा जात असल्याचे बोलले जात आहे. तसेच काही दिवसांपुर्वी नांदवेल जंगलात एका महिलेचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता.