माउंटबेरी परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे तोडून प्लॉट पाडण्यात आले

0

मनोर । गत वर्षांपासून आगी लागण्याचे प्रमाण सुरू असून, या आगी लावल्या जातात की लागते याबाबत नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण दिसत आहे. दरवर्षी गार्बट पॉइंट डोंगरावर वणवे लागलेले दिसतात. यामुळे जंगलाची वाताहत होतेच शिवाय रानटी प्राण्यांना तसेच सर्पांनादेखील आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. अमनलॉज रेल्वे स्थानकाजवळच असलेल्या अमनलॉज या बंगल्याच्या आवारात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागल्याचे लॉजिंगचालक श्यैबी रीझारीयो व राजा कुंभार यांनी पाहिल्यावर सात वाजण्याच्या दरम्यान तत्काळ येथील सन्मित्र ग्रुपमधील तरुणांना फोन करून सांगितले. सन्मित्र ग्रुपच्या तरुणांनी ताबडतोब घटनास्थळाचे दिशेने कूच केली अन् कशाचीही पर्वा न करता केवळ माथेरानची नैसर्गिक वनसंपत्ती अबाधित राहावी याच एकमेव उद्देशाने या ग्रुपच्या तरुणांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले आहे. याच भागातील दस्तुरी नाक्याजवळ असलेल्या माउंट बेरी या पॉइंटच्या जंगलात मागील काळात आग लावण्यात आल्याचे बोलले जात आहे.

कारण सदरच्या जागा या आड रानात असल्याने त्या जागी कब्जा करून आपल्या व्यवसायासाठी तयार करण्याचा डाव येथील काही विघ्नसंतोषी मंडळी जाणूनबुजून करत असल्याची चर्चा आहे. दिवसेंदिवस इथली वनराई परिसरातील लोक संपुष्टात आणू पाहत आहेत. त्यातच असे दुर्दैवी प्रकार घडत आहेत. त्यामुळे वनखात्याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. आगी लावण्याचे प्रकार हे सर्रासपणे परिसरातील मंडळीच करू शकतात. कारण त्यांना माथेरानच्या अस्तित्वाबद्दल काहीच सोयरसूतक नाही. केवळ आपला व्यवसाय करून येणार्‍या पर्यटकांची दिशाभूल करून त्यांचा खिसा खाली करणे हेच त्यांचे उद्दिष्ट असते. याकामी वनखात्यातील कार्यक्षम अधिकार्‍यांनी अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी कंबर कसणे गरजेचे बनलेले आहे. स्थानिक लोक हे आपला व्यवसाय सांभाळून वनराईचे रक्षण एखाद्या मुलाप्रमाणे करत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाराष्ट्र भूषण थोर निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सदस्यांमार्फत केले जात आहे.

माथेरानची मोठी हानी टळली
त्यामुळे तरी काहीअंशी का होईना वनराई जगत आहे. माथेरानचा नायनाट करू पाहणार्‍या समाजकंटकांचा जलदगतीने तपास करून त्यांना कठोर शासन करावे अशीच मागणी स्थानिकांमधून जोर धरू लागली आहे. आग विझवणार्‍या या ग्रुपचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अमनलॉज येथे ही आग जाणूनबुजून लावली असण्याची शक्यता आहे. वनखात्याने या आगीची सखोल चौकशी करावी. याअगोदर दोन वर्षांपूर्वी माउंटबेरी परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे तोडून प्लाट पाडले होते. तेव्हा तो अतिक्रमणाचा कट आम्ही उधळून लावला होता. आता पुन्हा अमनलॉज परिसरात आग लावली आहे. त्यामुळे संशयाला जागा आहे. अशाप्रकारे जंगलात आग लावली जाणे ही धोक्याची घंटा आहे. वनखाते आणि नगरपरिषदेने अशा प्रकारच्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठीच्या सर्व उपाययोजना कराव्यात. आज आमच्या मित्रांनी वेळीच आग नियंत्रणात आणली. त्यामुळे माथेरानची मोठी हानी टळली.