सर्वोच्च सात शिखरांपैकी आफ्रिकेतील पावणेसहा मीटर उंच पर्वत माथा
पिंपर-चिंचवड : जगातील सर्वोच्च सात शिखरापैकी एक असलेल्या आफ्रिकेतील पाच हजार 895 मीटर उंचीच्या ‘माउंट किलीमांजरो’ पर्वताच्या माथ्यावर सह्याद्रीचे मावळे गिर्यारोहक अनिल वाघ, क्षितिज भावसार, रवी जांभूळकर 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करून मर्तीवर अभिषेक करणार आहेत. ज्येष्ठ गिर्यारोहक सुशील दुधाणे आणि उद्योजक सूर्यकांत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आखली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोबत साडेचार किलोचा पुतळा
वाघ, जांभूळकर म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सर्वदूर पोचवावे व युवकांनी साहसी क्रीडा प्रकारात यावे यादृष्टीने ही मोहीम आखली आहे. दक्षिण आफ्रिकेतील टांझनिया येथील ‘माउंट किलीमांजरो’ मोहिमेसाठी सोमवारी (ता. 12) मुंबई येथून दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले. त्यासाठी सहा दिवस लागतात. चढाई करताना तीन आणि उतरताना दोन मुक्काम केले जाणार जाणार आहेत. शिखरावर जाताना साडेचार किलो वजनाची आणि दोन फूट उंचीची शिवरायांची मूर्तीही नेणार आहे. शिवजयंतीच्या दिवशी माथ्यावर पोचल्यावर तेथे शिवरायांच्या मूर्तीवर अभिषेकही करणार आहेत.’
ड्रोनव्दारे चित्रीकरण
भावसार म्हणाले, या ‘मोहिमेतील सर्व ऐतिहासिक क्षणांचे ड्रोनमधून चित्रीकरण करणार आहे. मोहीम यशस्वी झाल्यावर त्याचे चित्रीकरण यू-ट्यूबवर प्रदर्शित करणार आहेत.’
अनुभवी गिर्यारोहक
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलात कर्मचारी म्हणून वाघ कार्यरत असून त्यांनी आत्तापर्यत हिमालयातील भागीरथी, गंगोत्री, आयलंड शिखरे सर केली आहेत. तसेच लिंगाणा सुळका अवघ्या 22 मिनिटांत चढून 23 मिनिटांत उतरण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे. चिखली येथील जांभूळकर बांधकाम व्यावसायिक असून ते परदेशी मोहिमेत प्रथमच सहभागी होणार आहेत. क्षितिज सिमेमॅटोग्राफर म्हणून व्यवसाय करतात.