पुणे । गिर्यारोहण संस्थेच्या गिरिप्रेमींनी कारगिल भागात स्थित माउंट कून या 7,077 मीटर उंच शिखरावर भारताचा तिरंगा फडकविला. महाराष्ट्रातील ही पहिली यशस्वी मोहीम आहे. एव्हरेस्ट वीर रुपेश खोपडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सुमित मांदळे, किरण साळस्तेकर, दिनेश कोतकर व युगांक कदम यांनी ही मोहीम यशस्वी केली. गिरिप्रेमी संस्थेने जुलै महिन्यामध्ये माउंट नून, माउंट कून व माउंट सीबी 13 अशा हिमालयातील तीन आव्हानात्मक शिखरांवर मोहिमा आखल्या आहेत. त्यापैकी पहिली मोहीम संपूर्णपणे यशस्वी ठरली. माउंट कून वरील ही 2017 च्या मोसमातील पहिली यशस्वी चढाई आहे.
10 जुलैला यश
माउंट कून कारगिल भागातील सुरु व्हॅलीमध्ये वसलेल्या नून-कून या पर्वतरांगेचा भाग आहे. 7 हजारहून अधिक उंचीचे हे शिखर चढाईच्या दृष्टीने अत्यंत खडतर मानले जाते. गिरिप्रेमीच्या संघाने 8 जुलैच्या रात्री शिखर चढाईचा पहिला प्रयत्न केला होता, मात्र कॉर्निसरिजवर प्रचंड वेगाने वाहणार्या वार्यामुळे शिखरमाथा अवघ्या 400 मीटरवर असताना संघाला परतावे लागले. 10 जुलैच्या पहाटे केलेल्या प्रयत्नात सर्व संघाला शिखरमाथा गाठण्यात यश आले.
अवघड चढाई करून सर केला शिखर
या मोहिमेदरम्यान संघाने 5400 मीटर वर कॅम्प 1, 6200 मीटर वर कॅम्प 2 व 6400 मीटर वर कॅम्प 3 लावला होता. यांत कॅम्प 1 ते कॅम्प 2 दरम्यान 600 ते 700 मीटर उंचीची 60 अंश कोनातील हिमभिंत होती. या अवघड भिंतीवरून पुढे जात व इतर अवघड परीस्थितींशी धैर्याने सामना करत संघाने यश संपादन केले. या मोहिमे दरम्यान दोरचीशेर्पा, मिंग्माशेर्पा व कामे शेर्पा यांची मोलाची मदत झाली. या मोहिमेला श्री. शिव छत्रपती पुरस्कार विजेते गिर्यारोहक उमेश झिरपे व गिरिप्रेमीचे ज्येष्ठ गिर्यारोहक अविनाश फौजदार यांनी मार्गदर्शन केले.