‘माउली’चे गणेशावतार चंदन उटी रूप पाहण्यास भाविकांची आळंदी मंदिरात गर्दी

0

आळंदी : गुढीपाडव्यानिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदन उटीतून श्री’चे गणेशावतारातील वैभवी रूप गांधी परिवाराने परिश्रम पूर्वक साकारले. श्रीचे वैभवी रूप पाहण्यासह दर्शनास भाविक नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती.

माउली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत चैत्र महिन्यात गुढीपाडव्यापासून श्रीचे संजीवन समाधीवर चंदन उटी लेप लावण्यास प्रारंभ होत असतो. चैत्र महिन्यातील पहिली चंदन उटी गुढीपाडव्यास श्रीचे संजीवन समाधीवर आकर्षक वस्त्रालंकार वापरून श्रीचे वैभवी गणेशावतार रूप गांधी परिवाराने चंदन उटीतून साकारले. यासाठी श्रीक्षेत्रोपाध्ये माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी, माजी नगरसेवक सुधीर गांधी आणि नितीन गांधी परिवाराने परिश्रम घेतले. गुढीपाडव्यानिमित्त माउली मंदिरात आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली होती. या लक्षवेधी सजावटीचे भाविकांनी स्वागत केले.

आळंदी मंदिरात गुढी पाडव्यानिमित्त ‘श्री’ना पवमान अभिषेक पूजा प्रमुख विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी यांचे हस्ते सपत्नीक झाली. यावेळी विश्वस्त योगेश देसाई, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे उपस्थित होते. परंपरेने श्रीचे चोपदार राजाभाऊ रंधवे यांचे हस्ते गुढी पुजन करण्यात आले. साधकाश्रम तर्फे ह. भ. प. किसन महाराज साखरे यांचे प्रथम सत्रात आणि द्वितीय सत्रात चिदंबरेश्वर साखरे यांची प्रवचन सेवा झाली. वारकरी शिक्षण संस्थेतर्फे कीर्तन सेवा रुजू करण्यात आली. दरम्यान मंदिरात पहाटे घंटानाद, काकडा, भाविकांच्या महापूजा, महिमन्पुजा, ‘श्री’ना दुधारती, धुपारती आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले.

आळंदीत हेलिकॅप्टर पुष्पवृष्टी उत्साहात
दरम्यान वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी पूर्ती महोत्सवानिमित्त तीर्थक्षेत्र आळंदी, देहू,भंडारा डोंगर, संस्था प्रकार आदी ठिकाणी तसेच परिसरात अन्नदान माधुकरी सेवेचे ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. महोत्सवानिमित्त आळंदीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला. यावेळी संस्थेच्या विविध उपक्रमासाठी भाविकांनी देणग्या देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. परंपरेने संस्थेच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आले.

श्रींचे कुलस्वामीनींची अर्थात आई भगवती देवी श्री सप्तशृंगी देवी मातेचा आशीर्वाद घेऊन आईसाहेबांच्या 18 हाताला स्पर्श झालेले भरजरी वस्त्र, पैठणी आणि भगवती चरणा वरील हळदी-कुंकू माऊलींचे समाधीला श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे कार्यकारी मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांचे हस्ते अर्पण करून श्रींची पूजा करण्यात आली. तत्पूर्वी श्रींचे संजीवन समाधीला चंदन लेप, श्रींची आरती, महानैवेद्य झाला. या प्रसंगी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे मंदिर सेक्रेटरी राजू पवार, सुरक्षा विभागाचे गुलाब हाताळे, सचिन पैठणकर, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, मालक बाळासाहेब आरफळकर पवार, स्वामी सुभाष महाराज, माऊलींचे मानकरी ज्ञानेश्वर कुर्‍हाडे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, सचिव रामदास दाभाडे या प्रसंगी उपस्थित होते.

आळंदी मंदिरास राज्यमंत्री शिवतारे यांची सदिच्छा भेट
जलसंपदा राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांनी गुढीपाडव्यानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास तसेच वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी पूर्ती महोत्सव अखंड हरिनाम सप्ताहास भेट देऊन आळंदी मंदिरात श्रींचे दर्शन घेत मंदिराची पाहणी केली. देवस्थानच्या वतीने राज्यमंत्री शिवतरे यांचा श्रीफळ देऊन माउली वीर यांनी सन्मान केला. वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने सचिव नाना चंदिले, विश्वस्त भालचंद्र नलावडे यांचे हस्ते सत्कार केला. या प्रसंगी पुणे जिल्हा परिषद दिलीप यादव, शिवसेना जिल्हा अध्यक्ष राम गावडे, पुणे महापालिकेचे नगरसेवक अक्षय खेडेकर, माजी अध्यक्ष रोहिदास तापकीर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर, नंदकुमार दाभाडे, रामदास दाभाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती खेड सदस्य बाळासाहेब ठाकूर, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर झोंबाडे, संदीप कायस्थ आदी उपस्थित होते.