आळंदी : मकर संक्रांतीचा सण आळंदीत पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. लाखावर महिला भाविकांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रींचे दर्शनासह ओवसण्यास गर्दी केली होती. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिरात भल्यापहाटे देवस्थानच्या वतीने माउलींच्या समाधीवर तिळाचा अभिषेक करण्यात आला. सुवासिनी सुगडाचा वसा म्हणून देवाला ऊस, बोरे, शेंगा, तीळ, हरभरे, गाजर वाहत होते. तसेच एकमेकींना वाण देण्यासाठी दिवसभर मंदिरात गर्दी होती. महिलांसाठी महाद्वारातून प्रवेश दिला जात होता. तसेच गणेश दरवाजा, पान दरवाजा, हनुमान दरवाजा भाविकांना बाहेर पडण्यासाठी उघडण्यात आला होता.
आळंदीला जत्रेचेस्वरूप
आळंदीला जत्रेचेस्वरूप प्राप्त झाले होते. मंदिर परिसर आणि इंद्रायणी काठी ऊस, बोरे, विक्रेते तसेच बांगड्या, भेळ विके्रत्यांची गर्दी होती. पुरुष भाविकांना मंदिरात प्रवेश देऊन मंदिर प्रदक्षिणानंतर बाहेर जाण्याची व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. पौष महिन्यात येणार्या संक्रांत सणानिमित्त महिला सुगडाचा वसा घेऊन देहू, आळंदी, पंढरपूर येथे जातात. या वर्षीही राज्यभरातून अनेक महिलांनी आळंदीतील माऊलींच्या मंदिरात सकाळ पासूनच गर्दी केली होती. महिला सुगडाचा वसा म्हणून देवाला ऊस, बोरे, शेंगा, तीळ, हरभरे, गाजर वाहत होत्या.
इंद्रायणी तीरावरही महिलांची गर्दी
दिवसभर समाधीवरील महापूजा बंद केल्या होत्या. सुवर्णपिंपळ, नाथ पार तसेच इंद्रायणी नदी घाट, आळंदीतील विविध मंदिरे यामध्ये विष्णू मंदिर, राम मंदिर, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ, गोपाळपूर, इंद्रायणी नदी घाट याठिकाणी महिलांची विशेष गर्दी होती. आळंदी मंदिरासह इंद्रायणी नदी घाट देऊळवाड्यात महिला आणि पुरुष पोलिसांचा बंदोबस्त चोख होता. अनेक महिलांनी शहरातील जलाराम मंदिरातील संतोषीमाता मंदिरातही वाण देण्यास महिलांची गर्दी होती. इंद्रायणी तीरावरही महिलांची लक्षवेधी गर्दी होती.
शहरातील रस्त्यावर दुकाने सजली
आळंदीला आज दिवसभरात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहरातील रस्त्यावर बांगडीवाले, गजरेवाले, पेढेवाले, खेळण्यांची दुकाने सजली होती. अनेक महिला जुन्या काळातील पाटल्यांच्या बांगड्या हातात भरून घेण्यासाठी गर्दी करून होत्या.दुपारनंतर बाहेरून येणार्या महिलांची गर्दी कमी झाली. मात्र चारनंतर शहरातील स्थानिक मुली मंदिरात फुगड्या, फेर, तिळगूळ वाटप करण्यासाठी मोठ्यासंख्येने जमल्या होत्या. भाविकांना कमी वेळेत सुरक्षित दर्शन व्यवस्था आणि भाविकांची सुरक्षा यावर विशेष लक्ष देण्यात आल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले. शांतता आणि प्रभावी पोलीस बंदोबस्त यासाठी आळंदी पोलीस ठाण्याचे वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिराकडे रस्त्यावर दुकानदारांची दुकाने थाटल्याने भाविकांना ये-जा करण्यास काहीसे त्रासाचे झाले.