माऊलींचे आज प्रस्थान

0

आळंदी (अर्जुन मेदनकर): खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात तुळशीमाळ, कपाळी बुक्का अन् मुखाने हरिनामाचा जयघोष करीत राज्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातून आलेल्या लाखो वैष्णवांच्या मांदियाळीने प्रस्थानचे पूर्वसंध्येला इंद्रायणी तीर आणि अलंकापुरी जयघोषाने दुमदुमून गेली. शनिवारी (दि.17) श्रींचे मंदिरातील वीणा मंडपातून पंढरीला जाण्यास आषाढी पायी वारी अंतर्गत पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे.

वाहनांना प्रवेशबंदी
देहूतील प्रस्थानानंतर आळंदीत सोहळ्यासाठी गर्दीत वाढ झाली. नवीन दर्शनबारीतून भाविकांना दर्शनास मंदिर प्रवेश दिला जात आहे. महाद्वारातून दर्शनानंतर भाविक बाहेर येण्याचे नियोजन असल्याने पासशिवाय येथून पोलिस प्रशासनाने कोणासही आत सोडले नाही. आळंदीत अवजड वाहनांना आणि सोहळ्यातील वाहनाशिवाय इतर वाहनाने प्रवेश बंद असल्याने रस्त्यावर रहदारीचा त्रास भाविकांना झाला नाही. अनेकांनी आषाढी यात्रेतील नियोजनाचे स्वागत केले.