सोलापूर । महाराष्ट्राचे भूषण आणि संत परंपरेचा वारसा जपणारे लाखो वारकरी पंढरपूर तालुक्यात दाखल झाले असून मंगळवारी आषाढी एकादशीदिनी विठू माऊलीच्या दर्शनासाठी ते पंढरपूरात पोहचतील. अनेक दिवसांपासून दिंडी, वारीतून पायी चालत पंढरपुर गाठणारा माऊलीभक्त सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेला आहे. आता हे माऊलीभक्त पंढरपूर तालुक्यात दाखल झाले असून अहमदनगर मार्गाने संत निवृत्तीनाथ व संत एकनाथांच्या पालख्या करकंब येथे मुक्कामी आल्या आहेत. 55 हजार वारकरी त्यांच्यासमवेत आहेत.
भेटी लागी जीवा…
संत मुक्ताईची पालखी शनिवारी पंढरपुरात दाखल झाली , आता या सार्यांना आस आहे ती केवळ माऊलींच्या दर्शनाची. एकादशीच्या दिवसभरात दर्शनासाठी भाविक महत्व देतात.
अंदाजे चार लाख वारकरी
आळंदीहून आलेली संत ज्ञानेश्वर माऊली, देहूहून आलेली तुकाराम महाराज पालखी यांच्यासमवेत चार लाख वारकरी असून या दोन पालख्यांनी शनिवारी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. माऊली भंडीशेगाव येथे तर तुकाराम महाराजांची पालखी वाडीकुरोलीला मुक्कामी गेली. याच मार्गाने संत सोपानदेवही पंढरपूर तालुक्यात दाखल झाले असून त्यांच्यासमवेत 15 हजार वारकरी आहेत. संताजी महाराज जगनाडे, बालयोगी, चौरंगीनाथ, संभाजी महाराज, सेना महाराज या पालख्यांनीही याच मार्गाने पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला आहे.