गांधी जयंतीच्या मुहूर्तावर 2012 सालात आम आदमी पक्षाची स्थापना झाली. केजरीवाल हे त्यातले म्होरके होते. त्यात लोकपाल आंदोलनाचे बहुतांश कार्यकर्ते समाविष्ट होते. खरे सांगायचे तर त्यांची संघटना आधीपासूनच तयार होती. राजकारणात येण्यासाठी व वेगळी राजकीय चूल मांडण्यासाठी, या टोळीला काहीतरी नेत्रदीपक करून यायचे होते. त्यासाठी लोकपाल आंदोलन व भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीचा मुखवटा चढवण्यात आला होता. तो वेधक व आकर्षक असावा, म्हणून अण्णा हजारे यांच्यासारख्या निरागस माणसाला पुढे करण्यात आले होते. पण तेवढा हेतू सफ़ल झाला आणि माध्यमातील जोडीदारांनी केजरीवाल टोळीला यशस्वीरीत्या ख्यातनाम करून टाकताच, त्यांना अण्णांची गरज राहिली नव्हती. म्हणूनच सहजगत्या अण्णांना बाजूला करण्यात आले. जे कोणी नंतर आडवे येण्याचा धोका होता, त्यांना खूप आधीपासून बाजूला टाकलेले होतेच. साहजिकच मूळच्या केजरीवाल टोळीने यशस्वीरीत्या लोकपाल आंदोलनाचा वारसा आपल्या नावे सात/बारा घ्यावा तसा बळकावला. त्यालाच मग आम आदमी पक्ष असे नाव दिले. म्हणजेच पक्षाचा आरंभच बदमाशीने झालेला होता. पण ती बाब वेगळी आहे. लोकपाल आंदोलनात नसलेले अनेकजण नंतर राजकीय पक्षात दाखल झाले. त्यामध्ये योगेंद्र यादव यांचाही समावेश होता. राजकारणाचा व्यासंगी अभ्यास व विश्लेषणाची वेगळी हातोटी म्हणून प्रसिद्ध असलेले यादव यांनी, नव्या पक्षाचे भविष्य सांगताना केलेले एक भाष्य आठवते. त्यांनी कांशिराम यांचा दाखला दिला होता. ‘पहला चुनाव हारने के लिये. दुसरा चुनाव हराने के लिये और तिसरा चुनाव जितने के लिये’, अशा कांशिराम यांच्या रणनीतीने आम आदमी पक्ष जाईल, असे भाकीत यादव यांनी केले होते. पण आज काय झाले आहे? यादव कुठे आहेत आणि आम आदमी पक्ष कुठे पोहोचला आहे?
अवघ्या दोन तीन वर्षांतच केजरीवाल यांनी योगेंद्र यादव यांचाही अण्णा करून टाकला. म्हणजे ज्या तत्त्वांनी व विचारांनी पक्ष चालवला जावा, अशी अपेक्षा बाळगून यादव त्यात दाखल झाले होते, त्याचीच लक्तरे त्यांच्यासमोर केजरीवाल राजरोस करू लागले होते. त्यामुळे पारदर्शक राजकारणाचा हवाला देऊन बोलणर्या यादवांना अपमानित होऊन पक्षातून बाहेर पडावे लागले. राजकारणाचा अभ्यास व विश्लेषण किती सोपे असते आणि प्रत्यक्ष राजकारणात वावरणे किती अनपेक्षित असते, त्याचा दारुण अनुभव यादवांना घ्यावा लागला. कारण केजरीवाल नामक एका पांढरपेशा बदमाशाशी आपण व्याहार करतोय; याचे कुठलेही भान त्यांना नव्हते. राजकारणात मोठे शब्द वा उदात्त गोष्टी, या जनतेला भुलवण्यासाठी सांगितल्या व बोलल्या जात असतात. प्रत्यक्ष व्यवहारात तशाच्या तशा वर्तनाची अपेक्षा बाळगणे म्हणजे चक्क खुळेपणा असतो. यादव त्याअर्थाने खुळाच माणूस होता. साहजिकच पहिल्या विधानसभा निवडणुकीत त्या नव्या पक्षाला चांगले यश मिळाल्यानंतरची त्यांची प्रतिक्रियाही लक्षात राहण्यासारखी होती. कांशिराम यांचा सिद्धांत तीन पायर्यांचा आहे. पण आम आदमी पक्षाने पहिल्या प्रयत्नातच दोन पायर्या चढल्या आहेत, असे यादव यांना वाटले होते. आपण प्रत्यक्ष राजकारणात आहोत आणि कडेला बसून विश्लेषण करीत नाही, याचे भान विश्लेषकांना राहत नाही, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच केजरीवाल त्यांना हवे तसे काहीही करत होते आणि यादव मात्र त्यावरून सिद्धांत मांडण्याचा खुळेपणा करीत होते. साहजिकच इतरांचे काटेकोर विश्लेषण करणार्या यादवांना, केजरीवालच्या चोर्या व भामटेगिरी दिसत नव्हती वा बघायची नव्हती. म्हणून त्यांना बळी जाण्यातून सुटका नव्हती. तसा तो बळी दोन वर्षांपूर्वी गेला. पण त्यामुळे तटस्थपणे हा विश्लेषक आता केजरीवाल यांचे विश्लेषण करू शकतो आहे.
दिल्लीतील राजौरी गार्डन या पोटनिवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना आम आदमी पक्षाच्या दारुण पराभवाची कारणे यादवांनी नेमकी सांगितली आहेत. अजूनही पक्षात असते, तर इतके नेमके विश्लेषण त्यांना करता आले नसते. आजही त्यांनी केजरीवालच्या बालीशपणाला तत्त्वांचा झगा चढवला असता. पण पक्षातून अपमानित होऊन हाकलले गेल्याने यादव महाशय आता शुद्धीत आहेत. त्यांनी आम आदमी पक्षाच्या र्हासाचे कारण सांगताना, नेमके दुखण्यावर बोट ठेवले आहे. भाजपची लाट या नव्या पक्षाला संपवणार काय, असा प्रश्न विचारला असता यादव म्हणाले, भाजपनेच आम आदमी पक्षाला पराभूत केलेले नाही. बाहेरून भाजप या पक्षाला संपवू बघत आहे, तर आतून त्या पक्षाचा विनाश केजरीवालच घडवून आणत आहेत. भाजप हा विरोधी पक्ष असल्याने त्याने आपल्या विरोधातल्या पक्षाला नेस्तनाबूत करणे हे त्याचे कामच असते. पण अशा अंगावर येणार्या विरोधक वा प्रतिस्पर्ध्याला पुरक ठरेल, असा मूर्खपणाही आपण करायचा नसतो. केजरीवाल नमके तसेच वागतात. त्याचा भाजपला लाभ मिळालेला आहे. दिल्लीकरांच्या मनातून या नव्या सत्ताधारी पक्षाचे आकर्षण संपावे, असा प्रयास भाजप वा काँग्रेस करणारच. पण आपल्याविषयी जनमत बिघडावे किंवा लोकांमध्ये आपविषयी घृणा निर्माण व्हावी, अशा उचापती केजरीवालही सातत्याने करीत राहिले आहेत ना? पुराव्यानिशी विरोधकांनी आरोप करावे, अशी कारणे केजरीवालनीच दिलेली नाहीत काय? भ्रष्टाचार त्यांनी वा त्यांच्या सहकार्यांनी केला असेल व त्यातून जनता नाराज झालेली असेल, तर त्याचा दोष काँग्रेस वा भाजपला कसा देता येईल? ते आरोप करतात व केजरीवाल यांना मुद्दे व तपशील पुरवतात. म्हणजेच आतून केजरीवालच पक्षाची लोकप्रियता पोखरून काढतात ना? गेल्या दोन वर्षांत केजरीवालनी लोकांच्या विश्वासाला पायदळी तुडवल्याचे खापर, अन्य कोणाच्या माथी कसे मारता येईल?
पण सवाल आज केजरीवालच्या चुका सांगण्याचा नसून, एका आंदोलनातून उदयास आलेल्या पक्षाच्या भवितव्याचा आहे. या आंदोलनाने जनमानसात मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या होत्या आणि त्यात सहभागी झालेल्या यादव यांच्यासारख्या अभ्यासकाची त्यात मोठी जबाबदारी होती. जनतेच्या भावना जितक्या हळव्या असतात, तितक्याच क्षुब्धही लवकर होतात. आज तुमच्याकडून अपेक्षा बाळगणारा सामान्य माणूस चिडला, तर तुम्हाला नेस्तनाबूत करतो. हा धोका त्यावेळी बेभान झालेल्या केजरीवालना दाखवण्याची जबाबदारी यादव यांचीच होती. पण ती पार पाडण्यापेक्षाही यादवही प्रसिद्धी मिळणार्या नाटकात खुशीने सहभागी झालेले होते. मोदीविरोध वा कांगावखोरीला प्रोत्साहन देण्याचे पाप त्यांनीच केलेले होते अन्यथा समोर येणार्या प्रत्येक प्रश्नाला टांग मारून केजरीवाल इतके बेभान कांगावा करीत गेले नसते आणि आज त्या नवख्या पक्षाची इतकी दुर्दशा होऊ शकली नसती. केजरीवाल म्हणजेच आम आदमी पक्ष आणि त्यांचा पोरकटपणा म्हणजेच पक्षकार्य, अशा थराला गोष्टी जाऊ लागल्या, तेव्हाच त्यात हस्तक्षेप केला असता, तर विधानसभेच्या मध्यावधीत त्या पक्षाला इतके यश मिळाले नसते. केजरीवाल इतके निरंकुश झाले नसते. पण झटपट यश मिळवण्याचा हव्यास यादवांनाही होता आणि त्यातूनच पुढला विनाश ओढवलेला आहे. कारण त्या यशाने केजरीवाल बेताल झाले आणि मग यादवही निकामी ठरून गेले होते. पक्ष पहिल्या पावलात दोन पायर्या चढलेला नव्हता, तर वेड्या धाडसाने घेतलेली ती झेप होती. ज्याला मराठीत ‘माकडाला चढलेली भांग’ म्हणतात, तशीच काहीशी अवस्था होती. आता पक्षाचा विनाश होतो आहे आणि झिंगलेल्या माकडांना शुद्ध येण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. केजरीवालचे सोडा, अजूनही राजकारणात धडपडणार्या योगेंद्र यादवांनी व्यवहार व तत्त्वज्ञान यातली दरी अजून पार केलेली नाही.