रेल्वे प्रशासन थांब्यांवर थांबेना !

0

पाचोरा। चाळीसगाव रेल्वे स्थानकावर सचखंड, अत्योंदय एक्सप्रेसला नुकताच थांबा देण्यात आला आहे. लवकरच राजधानी एक्सप्रेसला देखील या ठिकाणी थांबा मिळणार आहे. पाचोरा येथे सुध्दा या गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी पाचोर्‍यातील नागरिकांनी केली आहे. पाचोरा तालुका रेल्वे समितीने महिन्याभरापूर्वी 26 एप्रिल रोजी पाचोरा शहरातील नागरिकांनी रेल्वे स्थानकावर मोर्चा काढला होता. मात्र महिन्याभराचा कालावधी उलटुन देखील नागरिकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाही. अद्यापही पाचोरा रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा मिळालेला नाही. ग्राहक सेवा संघ पाचोरा भडगांव या सेवाभावी व स्वयंसेवी संस्थेने रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी पुढाकार घेतला आहे.

27 वेळा निवेदन
ग्राहक सेवा संघ पाचोरा-भडगांव या सामाजिक संस्थेने 1993 पासून ते आजपर्यंत 27 निवेदने रेल्वे प्रश्‍नांच्या संदर्भात जनरल मॅनेजर रेल्वे बोर्ड नवी दिल्ली, रेल्वे मंत्री भारत सरकार यांना पाठविलेली आहेत. सी.के.जाफर शरीफ, नितीश कुमार, राजविलास पासवान, लालुप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, दिनेश त्रिवेदी, मल्लीकार्जुन खलसे, सदानंद गौडा, सुरेश प्रभू अशा सर्वच रेल्वेमंत्र्यांना निवेदन पाठविली आहेत.

खासदारांबद्दल नाराजी
चाळीसगांव रेल्वे स्टेशनवर सचखंड, अंत्योदय व राजधानी एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी पाचोरा तालुका रेल्वे समितीतर्फे अनेक वेळा रेल्वे प्रशासन व जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए.टी.पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आली. मात्र अद्यापही थांबा मिळाला नसल्याने पाचोरा तालुक्यातील नागरिक खासदारांबद्दल नाराजी व्यक्त करीत आहे. मागण्याची दखल न घेतल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे.

या आहेत मागण्या
पाचोरा रेल्वे स्टेशनवर सचखंड, महानगरी, विदर्भ, अमरावती, मुंबई या गाड्यांना थांबा मिळावा, पाचोरा रेल्वे स्टेशनला मॉडेल स्टेशनचा दर्जा मिळाला पाहिजे, पाचोरा-जामनेर नॅरो गेजचे ररुपातर ब्रॉड गेज मध्ये करण्यात यावे, भुसावळहून मुंबईसाठी एक एक्सप्रेस व एक पॅसेन्जर गाडी सुरु करावी, भुसावळहून पुणेसाठी दौंड मार्गे एक्सप्रेस व एक पॅसेजन गाडी सुरु करावी, महाराष्ट्र एक्सप्रेस 18 बोग्याऐवजी 24 बोग्याची करावी, भुसावळ-देवळाली शहराची वेळ पूर्ववत करावी, पाचोरा शहराचा माल धक्का सुरक्षीत ठिकाणी हलवावा, रेल्वे ग्राहकांसाठी नवीन जीना तयार करावा आदी मागणी करण्यात आली आहे. जर ह्या रेल्वेंना पाचोर्‍यात थांबा मिळाला तर प्रवाशांना ती लाभदायक ठरणार आहे. प्रवाशांच्या दृष्टीने सोयस्कर ठरणार आहे.