मागणी वाढल्याने कांद्याचे दर चढेच

0

पुणे । गेल्या काही दिवसांत कांद्याची आवक घटली होती. त्यामुळे भाव वाढले होते. रविवारी मार्केटयार्डात तब्बल 150 ट्रक कांद्याची आवक होऊनही दरात वाढ झाली आहे. परराज्यात तसेच इतर जिल्ह्यात कांद्याला मागणी असल्याने भाव वाढत आहेत. किरकोळ बाजारात नवीन कांदा 40 ते 60 रुपये आणि जुना कांदा 50 ते 65 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. दरम्यान, नवीन हळवी कांद्याचा हंगाम सुरू झाला असून रविवारी तब्बल 125 ट्रकची आवक झाली आहे. तर जुन्या कांद्याची 20 ते 30 ट्रक इतकी आवक झाली असल्याची माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ आणि व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.

महाराष्ट्रातील कांद्याची मागणी वाढली
रविवारी घाऊक बाजारात नवीन कांद्यास 350 ते 450 आणि जुन्या कांद्यास 400 ते 520 रुपये भाव मिळाला तर कर्नाटक राज्यातून हळवी कांद्यास प्रचंड मागणी वाढली आहे. त्या ठिकाणच्या स्थानिक कांद्याचा हंगाम संपला आहे. त्यामुळे राज्यातील कांद्यास मागणी वाढली आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी मार्केटयार्डात कांद्याची आवक ही 50-60 ट्रक इतकी होती. मात्र रविवारी त्यामध्ये तिपटीने वाढ झाली आहे. आवक वाढल्याने दर घसरतील असा अंदाज होता. मात्र, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही बाजार समित्या गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्यामुळे त्या ठिकाणी होणारी कांद्याची आवक पुणे मार्केटमध्ये झाली तसेच तेथील खरेदीदारही कांदा खरेदीसाठी आल्याने दरामध्ये वाढ झाली आहे. नवीन हळवी कांद्याची आवक नगर जिल्ह्यातील संगमनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातून होत असून ही आवक पुढील दोन महिने सुरू राहणार असल्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.

शेतकरी समाधानी
गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याचे भाव वाढल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. यापुर्वी कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने ते हवालदिल झाले होते. मात्र, आता कष्टाला दाम मिळाल्याची त्यांची भावना आहे. दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत असल्याने ते नाराज आहेत.