वासिंद । मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे प्रवाशांचा आक्रोश गुरुवारी कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या साखळी उपोषणातून व सह्यांच्या मोहिमेतून व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाला सह्यांद्वारे शेकडो प्रवाशांचा व संघटनांचा जाहीर पाठिंबा मिळाला. शेवटी रेल्वे प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. कल्याण – कसारा मार्गावरील प्रवाशांची रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने उपेक्षा केली जाते. प्रत्येक स्थानकांवरील प्राथमिक सुविधांचा वानवा, दर एक ते दिड तासामागे लोकल फेरी, पिक अवरमध्येही केवळ मेल, एक्सप्रेस व मालवाहतूक गाडी लोकल सिग्नलवर उभी करून पुढे या गाड्या सोडण्यात येतात.
विविध संघटनांच्या प्रतिनिधींची भेट
नियमित कसारा, आसनगाव, टिटवाळा, कर्जत या लोकल उशिरा धावतात. पर्यायाने चाकरमानी आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अपरिमित नुकसान होते. नवीन वेळापत्रकात कसारा, आसनगाव या नवीन गाड्या वाढविल्या नाहीत हा असंतोष या प्रवाशांमध्ये खदखदतोय हा या उपोषणाच्या ठिकाणी व्यक्त होताना दिसत होता. संघटनेतर्फे साखळी उपोषणाबाबतची भूमिका या मार्गावरील प्रवाशांपर्यंत पोहचण्याकरिता संघटनेतर्फे एक पत्रक व लक्षवेधी बॅनर लावण्यात आले होते. या उपोषणाच्या ठिकाणी तालुक्यातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट देऊन पाठिंबा पत्र संघटनेला दिले.
सह्यांच्या मोहिमेला पाठिंबा
संघटनेच्या रजिस्टरबुकात 1250 प्रवाशांनी सह्यांच्या मोहिमेला पाठिंबा दिला.तर 38 प्रवाशांनी लेखी समस्या मांडल्या. जीआरपी वरिष्ठ पीआय माणिक साठे, आरपीएफचे विनोदकुमार मिश्रा यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांशी चर्चा करून हे उपोषण मागे घेण्याचे ठरले. या पत्राचा स्विकार करण्यात आला. या पत्रात संघटनेला प्रत्येक मागणीवर लेखी उत्तर मिळाले आहे. या सर्व मागण्यांवर रेल्वे प्रशासन सकारात्मक आहे.