मागण्या मान्य न केल्यास प्राणत्याग!

0

संभल (उत्तर प्रदेश) : दिल्ली येथे आता मी शेवटचे उपोषण करणार आहे, या उपोषणात जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर मी उपोषणातच प्राण त्याग करेन, असा इशारा थोर गांधीवादी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला. उत्तरप्रदेशच्या संभल येथे जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. हजारे यांनी 23 मार्च 2018 रोजी दिल्ली येथे आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. तसेच हे आपले शेवटचे उपोषण असल्याचे त्यांनी सांगितले. या उपोषणात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा, पोलिसांचा मार खाण्याची आणि जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा, असेही त्यांनी नीक्षून सांगितले. आज देशाला स्वतंत्र होवून 70 वर्षे झाली, मात्र तरीदेखील परिस्थिती बदलली नाही. इंग्रज निघून गेले मात्र आपल्या येथे सर्व जैसे थेच आहे, अशी टीकादेखील त्यांनी यावेळी केली.

मोदींच्या निर्णयाने लोकशाही धोक्यात!
अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर जोरदार टीका करत, मोदींच्या विरोधात 23 मार्चरोजी दिल्लीत उपोषण व जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. उत्तरप्रदेश दौर्‍यावर असलेल्या हजारे यांनी संभल येथील नगरपालिका मैदानावर भारतीय किसान युनियनच्या राष्ट्रीय किसान महापंचायत कार्यक्रमास हजेरी लावली. यावेळी बोलताना हजारे म्हणाले, देशातील शेतकरी देशोधडीला लागला असून, शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना केंद्रातील सरकार जबाबदार आहे. या सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या नाहीत. आपण शेतकरीप्रश्नी मोदींना अनेक पत्रे लिहिली परंतु, त्यांनी या पत्रांना साधे उत्तरही दिले नाही, अशी टीकाही हजारे यांनी केली. घणाघाती भाषणात हजारे यांनी मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचे अक्षरशः वाभाडे काढले. अण्णा म्हणाले, काम करण्यासाठी मोदी सरकारला संधी द्यावी म्हणून आपण साडेतीन वर्षे काहीही बोललो नाही. तरीही हे सरकार जेथे चुकत असेल त्या धोरणाला विरोध म्हणून त्यांना पत्रे पाठवली. परंतु, त्यांनी या पत्रांची अजिबात दखल घेतली नाही. मोदी सरकारला देशातील शेतकर्‍यांची काळजी नाही, परंतु उद्योगपतींची काळजी आहे. त्यांनी जनलोकपाल कमकुवत केला आहे. मोदी जीकाही पाऊले उचलत आहेत, त्यामुळे या देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, अशी टीकाही हजारे यांनी उपस्थित शेतकर्‍यांसमोर केली.

आता मोदी सरकार लक्ष्य…
मागच्या काही दिवसांपासून अण्णा हजारेंनी सरकारला लक्ष्य केले आहे. शेवटच्या आंदोलनात सरकारला आमच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्याच लागतील, नाहीतर मी आंदोलनातच प्राण त्यागेन, असे म्हणत त्यांनी आपला रोष व्यक्त केला. यापूर्वी केंद्रातील तत्कालिन संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकारविरुद्ध आंदोलन चालविणारे हजारे यांनी शेतकरीप्रश्नांसह लोकपाल विधेयकासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. त्यांनी सांगितले, की 23 मार्चरोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण करणार असून, देशभर जेलभरो आंदोलनही करण्यात येणार आहे. देशातील सर्व राज्यांत हे आंदोलन चालेल, असा इशाराही हजारे यांनी दिला आहे. जोपर्यंत शेतकरीप्रश्नी केंद्र सरकार ठोस पाऊले उचलत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालेल, असेही हजारे यांनी सांगितले.

हे आपले शेवटचे आंदोलन असेल. या आंदोलनातील मागण्या सरकारने मान्य केल्या नाही तर प्राणाची आहुती देईन.
– अण्णा हजारे