मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता आरक्षण द्या

0
उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन, सेनेच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक 
मुंबई:  मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मराठा आरक्षणप्रश्नी सरकारने विषेश अधिवेशन बोलवावे. याबाबत शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील,असे ते म्हणाले. सध्याची जी आरक्षणे आहेत ती रद्द न करता, आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे. मराठा आरक्षणाविषयी ‘मातोश्री’वर आज शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. त्यानंतर ते बोलत होते. महत्वाचे म्हणजे राज ठाकरे यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनीही आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी केली आहे. आहे त्या आरक्षणाला धक्का न लावता आर्थिक निकषावर आरक्षण द्या असे उद्धव ठाकरे म्हणाले. मागासवर्गीय आयोग कधी येणार? तो कसा येणार? तो येईल तेव्हा येईल, महाराष्ट्र पेटू देऊ नका, तातडीने आरक्षण द्या, असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले.
शिवसेनेच्या आमदारांनी मातोश्रीवरील बैठकीनंतर मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीसाठी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सेना आमदार गेले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले सर्व मुद्दे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले आणि आरक्षणाची मागणी करण्यात आली. दरम्यान मातोश्रीवर उद्धव ठाकरे म्हणाले कि, “आरक्षणाबाबात ज्या ज्या समाजाच्या मागण्या आहेत, त्या सर्व मागण्यांचा एकत्रित विचार करुन त्याबाबत एकमातने निर्णय घ्यावा आणि तो अहवाल संसदेकडे मान्यतेसाठी पाठवा. त्यासाठी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट पाहण्याची गरज नाही. आपण घेतलेला निर्णय संसदेत पाठवून तिथे मंजूर करुन घ्यावा. आम्ही सरकारच्या बाजूने आहोत. संसदेची त्वरीत मान्यता घेऊन हा विषय मिटवावा”
आर्थिक निकषावर आरक्षण द्या
  महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण पेटू नये, राज्यात शांतता नांदावी ही शिवसेनेची भूमिका आहे. सर्व समाजाबाबात एक काय ते ठोस प्रस्ताव तयार करुन संसदेला पाठवून निर्णय घ्या, जेणेकरुन मराठी बांधव आनंदी होईल, असे  उद्धव ठाकरेंनी नमूद केले. आरक्षण आर्थिक निकषावर असेल, असे  बाळासाहेब म्हणाले होते. प्रत्येक जातीला पोट असते पण पोटाला जात लावू नका अशी भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची भूमिका होती. आमचंही तेच म्हणणं आहे. पण जर तुम्हाला आर्थिक निकष मान्य नसतील तर तुम्ही कोणतेही निकष लावा पण गरिबांची पोटं भरा, नोकरीसाठी, शिक्षणासाठी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी तुम्ही कोणतेही निकष लावा असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आयोगाच्या अहवालाची वाट पाहू नये
मराठा समाज आज आक्रमक झाला आहे, म्हणून त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात आहे. जोपर्यंत ते शांततेने मागणी करत होते तेव्हा त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. मराठा आरक्षणासाठी तातडीने अधिवेशन बोलवा, घटनादुरुस्ती करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका असावी यासाठी मुंबईत शिवसेनेने बैठक बोलावली होती. माझ्या मराठा बांधवांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळालंच पाहिजे, त्यासाठी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट पाहू नये. मराठा समाजाने आक्रमकता सोडून द्यावी, तसेच कुठेही हिंसाचार करु नये असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले आहे.