सातत्याने वेळोवेळी वेगवेगळ्या संघटना व राजकीय पक्षामार्फत शहादा शहर बंद करण्यात आले होते. पर्यायाने सारी जनताच त्रस्त झाली असून आता बंद नको अश्या भावना आहेत. केवळ दोन चार जण गोळा झाले आणि अफवा पसरवली की उद्या शहादा बंद आहे. होणारे नुकसान बघता स्वतःहुन दुकाने बंद करुन घेतात असे वातावरण सध्या शहरात आहे. आजचा परिस्थितीत शहादा शहर जवळजवळ संवेदनशील होण्याचा मार्गावर आहे. शहादा शहर हे सामाजिक सलोखा निर्माण करणारे आहे. जिल्ह्यात सामाजिक सांस्कृतिक जपणुक करणारे म्हणून नाव लौकिक आहे. पण सार्या या गोष्टीना गेल्या दोन वर्षाचा इतिहास बघता झालेल्या मोठ मोठ्या घटना बघता कोणतीही जयंती अथवा उत्सव असो ती केव्हा शांततेत पार पडेल याबाबत पोलीस प्रशासन देखील सांशकतेचा भुमिकेत असते.
महापुरुष , राष्ट्रपुरूष , संतमहात्मे यांच्या जयंत्या साजर्या करुन मिरवणुका काढणे विविध जाती धर्माने उत्सव साजरे करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. जयंत्या उत्सव साजरे केलेच पाहिजेत. मात्र जनतेने , उत्साही तरुणांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवावे. शहरात या भावनांना कुठे तरी तडा जातो आहे. काही बोटावर मोजता येतील एवढेच समाजकंटक शहराला वेठीस धरतात. अश्या समाज कंटकाना आता जनतेने धडा शिकविण्याची वेळ आली आहे. शहादा शहर शांत व सलोख्याचे बनविण्यासाठी विविध जाती धर्माचा लोकानी योगदान देणे गरजेचे आहे. ज्या ज्या वेळी शहादा बंदचे आयोजन झाले त्या त्या वेळी गाल बोट लागले. जनतेचा मालमत्तेचे शासनाचे व शासकीय मालमत्तेचे आर्थिक नुकसान झाले. कोट्यावधी रुपयांची उलाढाल थांबली. शहराची बाजार पेठ पुन्हा रुळावर येण्यासाठी दहा ते बारा दिवस लागतात. निमित्त शोधण्यासाठी छोटेसे कारणही पुरेसे आहे. अफवांचे वारेमाप पिक येते अफवा पसरवणार्यांवर कार्यवाही होणे अपेक्षीत आहे. शहरात शांतता अबाधित ठेवायची असेल तर राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते , विविध सेवाभावी संस्थांनी योगदान देणे गरजेचे आहे. न्यायीक मागण्यासाठी आंदोलने केलीच पाहिजे पण त्याचा उद्रेक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. फलकांबाबत नगरपालिका व पोलीस प्रशासन विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते , जातीधर्माचे नेते यांची सामूहिक बैठक घेऊन एक नियमावली करावी अशी मागणी आहे.
फलकांचा विटंबनेवरुन जातीय दंगली झाल्या आहेत. या महिन्याभरात विसरवाडी , नंदुरबार , धडगाव व बोरद , मंदाणा येथील घटना ताज्या आहेत. पोलीस प्रशासनाचा भुमिकेत शहर संवेदनशील होत चालल्याचा निर्वाळा आहे. काही गोष्टींना प्रशासनही तेवढेच जबाबदार आहे हे विसरुन चालणार नाही. जिल्ह्यात शहादा शहर हे मोठे शहर म्हणून बघितले जाते. 100 पेक्षा जास्त पोलीस कर्मचार्यांची संख्या कमी असतांना पोलीस कर्मचार्यांचा नियुक्त्या केल्या जात नाही. गेल्या पंधरा वर्षापासून पाठपुरावा सुरु आहे. शहराची 65 हजार लोकसंख्या बघता आहे ती पोलीस कर्मचारी संख्या तोकडी वाटते.
– प्रा.गणेश सोनवणे, शहादा
9421530587