मागेल त्याला शेततळे योजनेची कामे 15 मे अखेर पूर्ण करा

0

जळगाव । जलसंधारणाचा उत्कृष्ट उपाय असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेतील शेततळी ही येत्या 15 मे अखेर पूर्ण करा, जेणेकरुन येत्या पावसाळ्यात त्यात पाणी साठून ते जमिनीत जिरेल आणि भूजल पातळीत वाढ होईल, असे निर्देश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज येथे दिले. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील कामांचा आढावा आज जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी घेतला.

दोन हजारपैकी 641 शेततळे पुर्ण
यावेळी जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी जिल्ह्यासाठी मिळालेल्या 2 हजार शेततळ्यांच्या उद्दिष्ट पूर्ततेबाबतचा आढावा घेतला. प्रत्येक सजा निहाय झालेल्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. पूर्ण झालेली कामे प्रगतिपथावरील कामे, प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली कामे आदींचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यात आला. यावेळी माहिती देण्यात आली की, मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत जिल्ह्यात 641 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. ही प्रगतीपथावरील कामे वेळेवर पूर्ण करावीत. 15 मे अखेर कामे पूर्ण करुन येणार्‍या पावसाळ्यापुर्वी जलसंधारणाची तयारी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी आज दिले.

कर्मचार्‍यांना तंबी
जिल्हाधिकारी यांनी बैठकीचा आढावा संक्षिप्त आढावा घेतल्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी कृषी पर्यवेक्षक, सहाय्यक कृषी अधिकारी यांची चांगलीच खरडपट्टी काढली. प्रत्येक कर्मचार्‍याचा कामांबाबत विचारणा करत प्रत्येकाना कोणतेही काम योग्य रित्या न केल्याने येत्या आठ दिवसात कामे लवकर पुर्ण न झाल्यास संबंधितांवर त्वरीत कारवाई केली जाईल तसेच वेळ आल्यावर त्यांचे पगारही कापण्याचे आदेश देण्यात आले आहे.