चोपडा । भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयातर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा रविवारी समारोप करण्यात आला. याप्रसंगी मंचावर समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षा तसेच भगिनी मंडळ संस्थेच्या उपाध्यक्षा छाया गुजराथी, कृऊबा सभापती जगन्नाथ पाटील, सहसचिव तथा नगरसेविका अश्विनी गुजराथी, सदस्या शैला गुजराथी, प्रिती गुजराथी, प्रा. आशिष गुजराथी, प्राचार्य उदय ब्रम्हे, मुख्याध्यापक अरुण संदानशिव, अरुण पाटील, संजय बारी, प्रा.शैलेष पाटील हे उपस्थित होते.
मान्यवरांचे मनोगत व्यक्त
समारोप प्रसंगी छाया गुजराथी यांनी अध्यक्षीय मनोगतात पर्यावरण रक्षणासाठी आणि बेटी बचावसाठी तरुण वर्गाने सक्रिय व्हावे अशी अपेक्षा केली. प्रमुख अतिथी जगन्नाथ पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिबिरातून रुजलेले संस्कार समाजापर्यंत पोहचवावे असे सांगत संजय बारी, अरुण संदानशिव, जितेंद्र जोशी यांनी मनोगतातून मार्गदर्शन केले.
प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन
शिबिरादरम्यान क.शा.वा. महाविद्यालयाचे डॉ. शैलेंद्र वाघ यांनी ’पर्यावरण संवर्धन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच डॉ.सॅम्युअल नाझरेथ (अध्यक्ष-आमराई मुंबई) तसेच सल्लागार मंडळ सदस्य, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांनी रासेयोच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील समस्या कशा शोधाव्या व त्या सोडवाव्या याबाबत मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील योगेश मोरये यांनी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना आपातकालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी व उपाययोजना याविषयी केले.
विविध उपक्रम राबविले
यावेळी शिबिरादरम्यान घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. तर सागर रायसिंग, भूषण दीक्षित, रेखा पावरा यांचा ’आदर्श शिबिरार्थी’ म्हणून गौरव करण्यात आला. जितेंद्र जोशी यांनी व्यक्तिमत्व विकास ही संकल्पना काही खेळांच्या माध्यमातून समजावून सांगितल्या. तसेच स्वच्छता रॅली, बेटी बचाव-बेटी बचाव, पथनाट्य व श्रमदान करण्यात आले.
यशस्वितेसाठी यांचे परिश्रम
अहवालवाचन कार्यक्रम अधिकारी प्रा आशिष गुजराथी व अमृता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रियंका बाविस्कर हिने तर आभार प्रदर्शन अमृता पाटील हिने केले. दीपक धनगर, ललिता कोळी, चेतन सोनवणे, भारती सोनवणे, उज्ज्वला धनगर, उर्मिला पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शिबिर यशस्वितेसाठी अजय बारी, रूपाली देसाई यांच्यासह नितिन पवार, दीपक माळी, रविंद्र गुजराथी यांनी परिश्रम घेतले.