माजी आमदारांना गोवण्यासाठी दबाव

0

धुळे । गुंड रफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्याच्या खून प्रकरणामध्ये माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे नाव गोवण्यासाठी आ.अनिल गोटे हे तपासी अधिकार्‍यांवर दबाव टाकीत आहेत. त्याचसोबत काही राजकीय व्यक्तींचेही नावही याप्रकरणात गुंतवण्यासाठी त्यांनी उठाठेव चालवलेली आहे. यासाठी ते दबावतंत्राचा वापर करीत आहेत. त्यामुळे याप्रकरणाची कसून चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने डीएसपी एम.रामकुमार यांच्याकडे करण्यात आली. राष्ट्रवादीने या दबावतंत्राचा वापर करणार्‍याची चौकशी करण्याची मागणी निवेदनद्वारे एसपींना केली आहे.

पोलीसांना मुंबई क्राईम ब्रँचची धमकी ; तपासी अंमलदारांचे संभाषणाचे सीडीआर तपासा
विशेष म्हणजे याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रॅन्च यांच्याकडून चौकशी करून तुमची प्रकरणे बाहेर काढील, अशा धमक्या देखील काही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या जात आहेत असे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. काही राजकीय मंडळींसह राजवर्धन कदमबांडे यांचे नाव चौकशीत घ्यावे, असा प्रयत्न आ.अनिल गोटे करीत आहेत. गुड्ड्या खून प्रकरणातील तपासीअंमलदार यांच्याशी त्यांचे झालेल्या संभाषणाचे सीडीआर मागविण्यात येवून संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात डीएसपी एम. रामकुमार यांना राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली. यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, शहराध्यक्ष मनोज मोरे, महापौर कल्पना महाले, किरण शिंदे, जि.प.माजी सभापती किरण पाटील, उपमहापौर उमेर अन्सारी, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा दयानंद मेहता, इंदुबाई वाघ, कैलास चौधरी, जगदीश गायकवाड, कमलेश देवरे, दिपक शेलार, गोटू मिस्तरी, रजनिश निंबाळकर, बाळु आगलावे, नंदु सोनार, अनिल मुंदडा, यमुनाबाई जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली आहे.

आ. गोटेंतर्फे खोट्या बातम्या
राष्ट्रवादीच्या निवेदनात म्हटले आहे की, गुड्ड्या खून प्रकरणावरून आ.अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या माजी आमदारांसह काही पदाधिकार्‍यांवर चिखलफेक करणे सुरु केले आहे. या प्रकरणाबाबत पुरावे नाहीत हे माहित असतांनासुध्दा अनिल गोटे यांनी प्रसार माध्यमांना खोट्या बातम्या दिल्याने त्याबाबत कारवाई होईल अशी भीती अनिल गोटे यांना असून त्यामुळे आता त्यांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या दृष्टिने तपासीअंमलदार, काही पोलिसांना फोन करणे, एवढेच नव्हे तर पोलीस अधिक्षकांसह इतर पोलीस अधिकार्‍यांच्या भेटी घेणे, त्यांच्यावर राजकीय दबाव आणणे असे प्रकार करीत आहेत.