नंदुरबार – लोकांना धमकावून तसेच छळवणूक करून घरपट्टी, नळपट्टी वसुलीची धमकी देऊन कर वसुली केल्यास तोंडघशी पडणार असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना पत्रकार परिषदेतून दिला आहे.
नंदुरबार शहरात सध्या घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली वरून सत्ताधारी शिवसेना भाजपात चांगलीच जुंपली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.ते म्हणाले की, करवसुलीसाठी प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी बैठक बोलावली. त्या बैठकीत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना निमंत्रित करण्यात आले. यावेळी त्यांनी जे नागरिक पालिकेचा कर भरणार नाहीत, त्यांचे नळकनेक्शन तोडणार व घरासमोर फलक लावले जाणार, अशा सूचना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बैठकीत दिल्या. वास्तविक त्यांना कुठलाही तसा अधिकार नाही. ते मतदार देखील नाहीत. असे असताना लोकांना धमकावून, आदेश देऊन घरपट्टी, पाणीपट्टी वसुली करणे हे खपवून घेतले जाणार नाही. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी जी बैठक घेऊन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना राजकीय पाठबळ देण्याचे काम केले म्हणून त्यांना निलंबित करण्याची मागणी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहोत असे त्यांनी सांगितले. जर घरपट्टी वसुलीसाठी नागरिकांची छळवणूक केली तर तोंडघशी पडणार असा इशारा विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेतून दिला.
यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी देखील माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कारभारावर गंभीर आरोप केला. आधी स्वतःचे अतिक्रमण काढा व मग इतरांचे काढण्याची हिंमत दाखवावी. नगरपालिकेने वसूल केलेल्या करवसुलीत देखील मोठा घोळ असल्याचा आरोप माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेला पालिकेचे विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर, नगरसेवक निलेश पाडवी, प्रशांत चौधरी, संतोष वसईकर, आनंदा माळी आदी उपस्थित होते.