माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन

Accident on Mumbai-Pune highway : Shiv Sangram President Vinayak Mete dies मुंबई : मराठा समाजाच्या प्रश्नाला नेहमीच न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर असलेले माजी आमदार विनायक मेटे यांचे रविवार, 14 ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रायगडच्या हद्दीत मेटे यांच्या वाहनाला अपघात झाला. दरम्यान, अपघातानंतर सुमारे तासभर त्यांना मदतच मिळाली नाही, असा गंभीर आरोप त्यांच्या वाहनाच्या चालकाने केला.

अखेरच्या क्षणापर्यंत समाजासाठी काम
मराठा आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा नेता, जगाला हेवा वाटावा असे शिवस्मारक व्हावं यासाठी मेटे यांचे प्रयत्न होते. रविवारी मराठा क्रांती मोर्चाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावल्याने त्याच बैठकीला हजेरी लावण्याकरिता मेटे बीडहून मुंबईकडे येत होते मात्र क्रूर काळाने त्यांच्यावर घाला घातला.

जागीच झाला मृत्यू
सूत्रांच्या माहितीनुसार, पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान मेटे यांच्या वाहनाला पाठीमागून आलेल्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने गाडी काही अंतर ओढत गेल्याने विनायक मेटे यांना जोरदार दणका बसला मात्र तासभर वैद्यकीय मदत मिळाली नाही, असा गंभीर आरोप मेटे यांचे चालक एकनाथ कदम यांनी केला आहे. दरम्यान, अपघातात पोलीस गार्डही तसेच चालक जखमी झाला आहे.